Wednesday, March 20, 2024

रामा पीर ते ख्वाजा पीर: अंबाडी दिगर चा संमिश्र सांस्कृतिक वारसा.

बंजारा समाज मध्ययुगीन काळापासून प्राय: भटका व्यापारी, दळणवळण करणारा असा राहिला आहे. अशा दीर्घ ऐतिहासिक प्रवासात अनेक सांस्कृतिक प्रवाह, धर्मविचार आणि ज्याला खऱ्या अर्थाने syncretic परंपरा म्हणतात अशा सर्वांशी या समाजाचा संपर्क येणं ही खूपच स्वाभाविक बाब मानली पाहिजे. म्हणूनच त्यांचा एकूणच सांस्कृतिक संचित अत्यंत समृद्ध आहे. उदा. आमच्या लहानपणी आम्ही नांदेड च्या हजुरसाहिब गुरुद्वारा येथे धोकेन जाणू म्हणजे दर्शनाला जायचं मला आठवतं. अजूनही गुरू साहिब यांचा भोग (प्रसाद) दरवर्षी दाखवला जातो.


त्याचप्रमाणे सगुण भक्ती परंपरेशी एक घट्ट नाळ असलेली दिसते. होळीच्या गीतांमध्ये प्रामुख्याने राम आणि कृष्ण यांच्या अख्यायिकांचे वर्णन आढळतात.

त्याच प्रमाणे बंजारा समाजातील बहुतांश कुळात तुळजा भवानी कुलदेवी असल्याची मान्यता आहे.

यासर्वांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही भाग येथील बंजारा समाजाचे आराध्य म्हणून रामदेवजी बाबा (रामदेवरा, राजस्थान) यांना मोठी मान्यता आहे. रामदेवजी बाबा यांचं वर्णन राम सा पीर, रामा पीर म्हणून अनेकदा येतो, भगवान कृष्ण यांचा ते एक अवतार असल्याची मान्याताही आहे. शोध घेतल्यावर असं कळलं की अठराव्या शतकातील मुंहता नैसी यांच्या मारवाड रा परगणा री विगत, आणि मुंहता नैसी री ख्यात (क्लिक केल्यावर दोन्हीं ग्रंथ डाउनलोड करता येतील)  या दोन ग्रंथात त्यांचं वर्णन गोरखपंथी किंवा मुस्लिम पीर असाही येतो. रामदेवजी बाबा यांची मानलेली बहीण डाळीबाई ही निजर पंथ किंवा महा धर्म पाळत असल्याची महिती मिळते (अधिक माहितीसाठी - येथे पहा ) डाळीबाई मेघवाल समाजाच्या होत्या (मेघवाल जातीचा समावेश अनुसूचित जातींमध्ये होतो) रामदेवजी बाबा यांना मानणाऱ्या वर्गात मेहतर समाजातील लोकही आहेत. रामदेवजी बाबा यांनी  मक्का हुन त्यांची परीक्षा घ्यायला आलेल्या पाच पिरांना दृष्टांत (परचो किंवा चमत्कार) दिल्याचा मौखिक पुरावा अनेक वाणींमधून मिळतो म्हणून त्यांचा संबंध मुस्लिम निजर पंथाशीही जोडला जातो त्यामुळे अनेक मुस्लिम भाविक त्यांना आजही पूजतात. (अधिक माहितीसाठी येथे पहा ) 

थोडक्यात रामदेवजी बाबा हे अनेक समूह, समुदाय आणि जाती धर्माचे लोक देवता असल्याचं लक्षात येतं. (संशोधनपर लिखाणासाठी क्लिक करा) 

रामदेवजी बाबा यांचा संदर्भ देण्याचं कारण जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाशेजारी एक अंबाडी दिगर नावाची छोटी वस्ती आहे तिथे ख्वाजा पीर यांची समाधी आहे . याबद्दलची माहिती मौखिक परंपरेत मिळते. फुलसिंग नायक नावाचे एक गृहस्थ होते त्यांच्या स्वप्नात ख्वाजा पीर येतात आणि त्यांना सांगतात कि माझ्या नावाच्या चार विटा एका ठिकाणी सापडतील, त्यानुसार विटा सापडतात आणि तिथे ख्वाजा पीर यांची समाधी (दर्गा) बनवली जाते, फुलसिंग नायक यांच्या अंगात ते ख्वाजा पीर येऊन लोकांना दृष्टांत देत होते अशी मान्यता आहे. फुलसिंग नायक यांच्या मृत्यूनंतर ख्वाजा पीर यांच्या समाधी शेजारी त्यांना पुरलं जातं आणि त्या शेजारी त्यांची समाधी (मजार) बनवली जाते. फुलसिंग नायक जेव्हा रामदेवजी बाबा यांच्या दर्शनाला रामदेवरा गेले होते तेव्हा परतीच्या प्रवासात अजमेर शरीफ दर्गा येथे गेले आणि तिथेही त्यांनी तिथल्या मुस्लिम भाविकांना दृष्टांत दिल्याचे वर्णन मौखिक परंपरेत येतात. फुलसिंग नायक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिथे बोकड्यांचा  बळी देऊन उत्सव साजरा केला जातो, याद्वारे ख्वाजा पीर यांचीही स्मृती जागवली जाते. दिवाळी दसऱ्याला ख्वाजा पीर यांच्या दर्ग्याला दिवे लावले जातात. रामदेव पीर ते ख्वाजा पीर असा हा प्रवाही आणि संमिश्र संस्कृतीचा वारसा अंबाडी गावातील तडवी भिल्ल समाज व बंजारा समाज अनेक वर्ष जपत आलेला आहे.


ख्वाजा पीर यांची समाधी


फुलसिंग नायक (जाधव) यांची समाधी. 

No comments:

Post a Comment

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...