Monday, January 20, 2025

"ही साखर आपल्याला गोड लागते खरी, पण ती किती लोकांचं रक्त आटवून बनवलेली असते"

तांड्यावरच्या नोंदी 

खान्देश आणि मराठवाड्यातील लोंढेच्या लोंढे भूमिहीन शेतमजूर पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीला जातात. विशेषतः बंजारा समाजातील बहुसंख्य भूमिहीन मजुरांचा यात भरणा असतो, आमच्या तांड्यातील अनेक लोकं अजूनही गुऱ्हाळीला (ऊसतोडीला) जातात, मुकादमाकडून घेतलेले पैसे त्याच्या परतफेडीसाठी सहा महिने गुऱ्हाळ असे हे न संपणारे दृष्टचक्र. असंच एक कुटुंब एक कोयता बांधून (एका कुटुंबातील मजुरांचा मिळून एक कोयता असतो, उसाला जाण्याला कोयता बांधणे असा शब्द वापरला जातो) सालाबदाप्रमाणे गुऱ्हाळीला गेला. त्या जोडप्याला नुकतंच तीन महिन्यांपूर्वी एक मूल झालं होतं. त्या मुलाला अर्थातच कड्यावर घेऊन हे जोडपं उसतोडीला गेलं. उसाच्या मळ्यात बनवलेल्या तात्पुरत्या झोपडीत हे मजूर राहतात. ती झोपडी अर्थातच दूर असते म्हणून आई आपल्या बाळाला जवळपास कुठेतरी झोळीत ठेवते, किंवा जागा मिळेल तिथे ठेवतात, जवळच दूध पाजायला जाता यावं म्हणून. 

सकाळी चार पाच वाजेपासून दिवसभर ऊसतोड करायची, मग बंडी विकायला जायचं, त्यानंतर रात्री पुन्हा ट्रक किंवा ट्रॅक्टर भरायचं आणि रात्री झोपडीत येऊन झोपायचं, असा नित्य दिनक्रम असतो. सकाळी त्या बाळाला जवळच एका मोकळी जागा बघून ठेऊन ती आई ऊस तोडायला लागते. ऊस भरायला आलेला ट्रॅक्टर त्यावरून जातो आणि तो मुलगा त्याखाली चिरडला जातो. हे सारं ऐकूनच मन सुन्न होतं, त्या आईला काय वेदना झाल्या असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ही घटना एका मित्राला सांगितल्यावर तो म्हणाला "ही साखर आपल्याला गोड लागते खरी, पण ती किती लोकांचं रक्त आटवून बनवलेली असते" 

होय खरंच ही साखर ऊसतोड मजुरांचं रक्त आटवून बनवलेली असते. सहा वर्षांपूर्वी एका पाहणीत तब्बल तेरा हजार महिला ऊसतोड मजुरांची गर्भाशयं काढल्याची उघडकीस आलं होतं. मासिक पाळीमुळे कुठल्याही प्रकारे कामावर सुट्टी पडू नये म्हणून एक तर मजबुरीने किंवा जबरदस्ती या महिलांनी आपली गर्भाशयं काढून टाकल्याची ती बातमी होती. ऊसतोड मजुरांची मुलं शिकुच शकत नाहीत. त्यामुळे शिक्षणाने परिस्थिती बदलण्याची कुठलीही शक्यता नाही. हे असंच पिढीजात चालत राहतं, कुठलाही फरक पडत नाही, अशी शेकडो अनाम बाळं "मरतात" कोणी प्रत्यक्ष, कोणी शिक्षणाअभवी, कोणी कुपोषणाने. 


छायाचित्र - सरोज शिंदे, साभार - अक्षरनामा


सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...