कबीर सिंग हा आपला
सामाजिक प्रॉब्लेम आहे !
- सागर नाईक[1]
कबीर सिंग या नुकत्याच आलेल्या चित्रपटाने ४००
कोटींचा गल्ला जमवला, हा चित्रपट ज्या अर्जुन रेड्डी चा रिमेक आहे त्यानेही जवळपास
इतकाच धंदा केला आहे. पारंपारिक बॉम्बे हिंदी सिनेमे हे जरी आपल्या सांस्कृतिक
परीवेशाचे आपत्य असले तरी तत्सम सिनेमे पॉप्युलर कल्चरही घडवीत असतात.(काकर, १९८१)
म्हणून याला अवास्तविक करार देऊन रद्दबातलही करता येत नाही किंवा अततायीपणाने प्रतिक्रिया
देऊन त्याला निकालातही काढता येत नाही.
सामान्यजनांच्या अतृप्त, सुप्त इच्छा आणि आकांक्षाचा काल्पनिक स्तरावर निचरा करणारी मनोवस्थाच
चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग असते. कबीर सिंग च्या संदर्भात अतृप्त पुरुषी मन आणि
पितृसत्ताक समाजात सामाजीकीकरणाच्या प्रक्रियेतून दुय्यमत्व, वस्तूकरण आत्मसात केलेल्या
तरुणी, व त्यांच्या प्रेमसंबंधाच्या कल्पना हे चित्रपटाच्या लोकप्रियतेच्या
गाभ्यास्थानी आहे. म्हणून चित्रपट हे मानसिक पातळीवरच्या ‘सामुहिक कल्पनारम्यता’
असतात (काकर, १९८१). चित्रपट आल्यानंतर त्यावर पेज थ्री स्त्रीवाद्यांनी कडाडून
टिका केली तर रूढीबाज चलाखांनी त्याला appropriate केलं. जसे आपल्या सार्वजनिक जीवनाचे ‘टू मिनिट्स मॅगी’ झाले
आहे त्याच नेणीवेतून सर्वांनी त्यावर toxic masculinity वैगरे अशा प्रतिक्रिया
नोंदविल्या तर काहींनी त्यात काही फारसा विचार करण्याची गरज नाही असे म्हंटले.
परंतु अशा प्रतिक्रियावादी मोड मध्ये चित्रपटातील पुरुषी हिंसेचे मूळ उकलून
दाखविणे, त्याचे चिकित्सक परीक्षण करणे राहून गेले , प्रस्तुत लेख त्या
त्यासंदर्भात एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
प्रेम कल्पना, प्रेमाचे भावविश्व हे त्या त्या विशिष्ट
सांस्कृतिक भौतिक आणि सामाजिक परिवेशात घडत असते (फ्रोम, १९६२: ८७) बॉलीवूड चित्रपटांमधील कथानके आणि त्याच्यात दर्शविलेली
नातेसंबंध यांचा मिथक कथांशी कसा संबध आहे याचे मानसशास्त्रीय मनोविश्लेषण सुधीर
काकर यांनी केले आहे. याच संदर्भचौकटीत नातेसंबंधांना बघायला हवे.
कबीर ची जडण घडण कशी झाली याचे सुरवातीलाच वर्णन करून त्याला चित्रपटात स्थापित केलं आहे. त्याची आजी म्हणते “उसके पास एक व्हाईट ड्रेस
वाली गुडिया थी, उसीके साथ खान उसीके साथ सोना, लेकीन एक दिन वो गुडिया खो गयी बहोत
रोया”. थोडक्यात वस्तूंसोबतच कबीर चे व्यक्तिमत्व जोडलेले आहे. होळीच्या दिवशी कबीर जेव्हा प्रीतीबद्दल
विचारपूस करतो तेव्हा शिवा (कबीर चा मित्र) त्याला म्हणतो “साला बचपन से हि ऐसा है
ना तेरा जहाँ लगेगा वही कर देगा” हे कबीर च्या व्यक्तिमत्वाचे केंद्रबिंदू
वारंवार अधोरेखित केले आहे. प्रेमभंग
झाल्यावर तो आपल्या कुत्रीला नाव सुद्धा प्रितीच ठेवतो. मोठा भाऊ त्याला घरी परत
चल म्हणून मनधरणी करायला येतो तेव्हाही त्याला सांगतो कि, “तेरे लिये रॉयल एनफिल्ड
ऑर्डर कि ही लंडन, कल से आ जायेगी” असे म्हणतो. कबीर ला जी ‘वस्तू’ पाहिजे ती हवीच
अशा प्रकारे त्याला चित्रपटात स्थापित केलं आहे. याची मुळे त्याच्या जडणघडणीत सापडतील. कबीर
सिंग आणि अर्जुन रेड्डी हे दोघेही पात्र ज्या जात-वर्गाचे प्रतिनिधित्व करतात,
ज्या कुटुंबातून येतात ते शहरात स्थायिक होऊन आधुनिक लाईफस्टाईल स्वीकारलेली असली
तरी त्यांच्या वर्तनात कमालीचे पारंपारिक मूल्य प्रतिबिंबित होतात. एका अर्थाने आपल्या mistaken
modernity किंवा विलासी आर्थिक जीवन
जगतानाही पितृसत्ताक मुल्यांचा जोपास याचे द्योतक मानले पाहिजे. म्हणून
चित्रपटातील नायक पुरुष हा प्रचंड अंतर्विरोधांनी ग्रासलेला
दिसतो. एकीकडे तो म्हणतो कि “क्या बोलते ही उसके पाप साड्डा मान साड्डा परिवार कौन सिखाता ही ये सब” आणि
दुसरीकडे म्हणतो कि प्रीतीच्या नवऱ्याला आमच्याबद्दल ‘सर्व’ माहित असूनही त्याला
कशाचाच फरक का नाही पडत, त्याला काही सेल्फ रिस्पेक्ट नाही का? शेवटी
‘पोट आलेल्या’ प्रीतीला बघून तो म्हणतो कि it’s just flesh and blood, मात्र लग्न करून घरी गेल्यावर त्यातला पुरुष जागा होतो
आणि त्याच्या भावाला खुणवतो कि हे माझं आपत्य आहे. प्रीती ‘गरोदर’ आहे बघून
भाऊच्या चेहऱ्यावरही समाधान झळकते.[2]
कोणी कल्पना करू शकेल का दिल्ली मेडिकल कॉलेज
च्या प्रथम वर्षाला असणाऱ्या सर्व मुली चिडीचूप एका रांगेत येत आहेत त्यातल्या
त्यात एकीनेही आदिदास तत्सम चे स्वेटर घातले नाहीये सर्वांचा pattern सारखाच (‘traditional’) आहे. या दृश्यांचे प्रयोजन काय असू शकेल? रांगेत असणारी एक प्रीती कबीर ला खूप भावते आणि
तो आणि तो वर्गात जाऊन सर्वांना ताकीद देतो कि “वो मेरी बंदी है उसे छोड
के बाकी सारी तुम्हारी, और भी ‘मौके’ आने है”. मुली म्हणजे संधी हि शब्दावली कुठून येते? याचे
उत्तर प्रेमसंबंधाबद्दलच्या कॉमन सेन्स च्या वास्तवात आहे. या नातेसंबंधांमध्ये
सत्तासंबंध असतात (रेगे, १९९९: १०) वर्गात कबीर चे मित्र मैत्रिणी तिला ‘बघायला येतात’ शिवा म्हणतो वो देख व्हाईट ड्रेस में.. “अच्छी है यार”! (कबीर चा दुसरा मित्र) “हम्म नाईस” (त्याची एक मैत्रीण म्हणते)
‘बघून’ ठरवणारा कबीर प्रीती ची मैत्रीण आणि रूममेट कोण असेल हेही ठरवतो. श्रुती ला
प्रीतीची मैत्रीण म्हणून ‘निवडतांना’ तो तिचे गाल ‘बघून’ निवडतो, तो म्हणतो “हेल्दी
चीक्स आर लाईक टेडी बेयर्स, वार्म अॅण्ड लॉयल” या स्त्रीदेहाच्या टोकाच्या
वस्तूकरणाला चित्रपट गृहात टाळ्या आणि शिट्ट्या नाही पडल्या तर नवलच म्हणावं.
होळीच्या दिवशी, “कोई लड़की भी उसको होली विश नही कर रही लडको की तो दूर की
बात है, मामला फुल ‘कंट्रोल’ में है भाई”, असं म्हणत तिला कोण विष करेल हे कंट्रोल करून All rights
reserved to ‘Him’. पण त्याचा स्वभावच तसा
आहे आफ्टरऑल प्रेमात चालायचं न हे सर्व! हा इथला पितृसत्ताक स्थायीभाव आहे .
आपल्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काही असो ना असो हिरो हिरोईन ची विलन पासून रक्षा
करतो आणि तिला ‘जिंकतो’ हे परीकथा सदृश्य कथानक असतेच असते. भांडण कबीर चं असत
मात्र त्याची युद्धभूमी असते प्रीती. प्रीतीला रंग लावताना तिचा विनयभंग केला जातो
आणि हिरो कबीर असं करणाऱ्याला मोजून काही दणके देऊन प्रीती सोबत पुन्हा असं होणार
नाही याचं वचन घेतो. तिथेच तो तिला ‘जिंकतो’. पुरुषाच्या वरचढपणाची, सत्तेची हि
धारणा मुलींच्या सामाजीकीकरणातून तयार केली जाते. (रेगे,१९९९: १६). चित्रपटही त्या
प्रक्रियेचे एक माध्यम आहे. तिला फक्त टॉपिक चं नाव विचारून वर्गातून घेऊन जाणारा
कबीर, तिची “बस दो दिन रुक जाओ ना” हि
‘याचिका’ फेटाळून लावतो. प्रेमसंबंधाचा मध्यवर्ती केंद्रबिंदूही तोच असतो कारण
त्याचा स्वभावच तसा आहे. म्हणून प्रीतीचं पूर्ण चित्रपटात काही म्हणणचं (say)
नाहीये. तेरे नाम मधली निर्जला
असो किंवा प्रीती असो अशा न बोलणाऱ्या आज्ञाधारक स्त्रीपात्राला प्रचंड लोकप्रियता
मिळण्याचे कारण काय असावे ? पाहिजे ती वस्तू पाहिजेच असा कबीर प्रेमविरहात प्रचंड
उपद्रवी वागत असतो. इतक की सर्रास चाकू दाखवून तो शरीरसुखाची मागणी करतो, हे सर्व
त्याच्या स्टाईल आणि प्रेमभंग याच्या नावाखाली कोणालाच आक्षेपार्ह वाटण्याचे कारण
नव्हते. सुरवातीला वर्गात येऊन “वो
मेरी बंदी है” असे सर्वांना धमकावण्यापासून ते, “कौन है तू कौन पहचानता है तुझे कॅम्पस में, कबीर सिंग की बंदी है तू बस” असे प्रीतीला ठणकावाण्यापर्यंत, ते प्रेमभंग झाल्यावरही “वो मेरी बंदी है बे” ही ‘मालकीची’ भावना तशीच असते जशी लहानपणात व्हाईट ड्रेस
वाली गुडीया बद्दल असते. वरवर बघता रागीट स्वभाव असलेल्या कबीर सिंग च्या प्रेमाच्या गोंडस नावाखाली सर्वांना नैसर्गिक वाटणाऱ्या पुरुषी हिंसेचे टोक
गाठलेले आहे. भुरळ पडणाऱ्या पार्श्वसंगीताने चित्रपटाची साजासजावट करून अशा
हिंसेचे रोमॅनटिक म्हणून उदात्तीकरण केले आहे. माचो पुरुषाची आत्मकल्पना बुलेट
शिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे भासवले जाते, प्रसार माध्यमांनी लोकप्रिय बनवलेल्या
अशाच प्रतीकांच्या संदर्भात वास्तवाचा विचार केला जातो.(रेगे, १९९९: २१) त्यांच्या
व्यापक अनुनायातूनही एक ग्राहकी पुरुषभान घडवले जाते.
भारतीय समाजावर अध्यारोपित पाश्चिमात्य
मूल्यांना सास्कृतिक अर्थ देणे हि बॉलीवूड चित्रपटांची सामाजिक भूमिका असते (नंदी,
१९८१ ) त्याला नव्याने अर्थ देतांना तो अर्थ नेहमीच पितृसत्ताक कोशातून दिला
गेलेला आहे. म्हणून जवळपास सर्वच मेनस्ट्रीम बॉलिवूड सिनेमे अशाच धाटणीचे असतात. या
सिनेमांचा ग्राहकवर्ग हा आधीच पारंपारिक पितृसत्ताक मुल्यांचा परिपोष करणारा आहे
तो त्याला भरभरून प्रतिसाद देणारच. ओम पुरी, नसिरुद्दीन शाह सारख्या कितीतरी
संवेदनशील कलाकार, निर्मात्यांना त्यांच्या artistic सिनेमांनी आर्थिक डबघईला आणले, कारण बोटावर मोजण्याइतके
लोकं तशी सिनेमे बघत. अशाच सुमार बॉलीवूड सिनेमांच्या भडीमाराने लोकांना
खऱ्या-खुऱ्या कलेचा आस्वाद घेण्यापासुनही
वंचित ठेवले आहे. शिवाय लोकांच्या कलासक्तीचे आणि अभिरुचीचे सपाटीकरण आणि
सुमारीकरणही घडवून आणले आहे. म्हणूनच स्त्रीवादाने झगडून मिळवलेल्या सर्व हक्कांचे,
सोयींचे एकीकडे उपभोग घेणारे आणि दुसरीकडे स्त्रीवादाला शिव्याशाप देणारे असे
ढोंगी विशेषत्वाने भारतात पदोपदी आढळतात.[3]
चित्रपटांच्या माध्यमातून एक पर्यायी वास्तवाची
कल्पना केली जाते (बेनेगल, २०१० ) परंतु भारतीय चित्रपटांची व्यवस्थात्मक
वास्तवाला दृढ करण्याची भूमिका राहिली आहे. त्यातूनच ग्राहकवर्गाची निर्मिती,
पारंपारिक कर्मठपणा, सौंदर्याच्या भांडवली कल्पना, प्रेमाचे भावविश्व यांच्या
बाबतचे कॉमन सेन्स घडविले जातात. म्हणून कबीर सिंग आणि तत्सम चित्रपटांमधील
पुरुषत्वाला गंभीरतेने घेऊन चिकित्सा महत्वाची आहे कारण anger
management चा प्रोब्लेम असलेला
कबीर सिंग आणि अर्जुन रेड्डी हा आपला ‘सामजिक प्रोब्लेम’ आहे जो पितृसत्तेतून
आविष्कृत झालेला आहे. म्हणूनच कबीर सिंग हा स्त्रियांचे नियमन करू पाहणाऱ्या
अतृप्त पुरुषी मनांचा आदर्श ठरतो.
© सागर नाईक
sagarnaik4511@gmail.com
संदर्भसूची –
१. Benegal,
S. (2010). Talkies, Movies, Cinema. India International Centre Quarterly, 37(1), 12-27. http://www.jstor.org/stable/23006452
२ .
Kakar, S. (1981). The Ties that Bind:
Family Relationships in the Mythology of Hindi Cinema. India International Centre Quarterly, 8(1), 11-21. http://www.jstor.org/stable/
४. Nandy, A. (1981). The Popular Hindi
Film: Ideology and First Principles. India International Centre Quarterly, 8(1), 89-96. http://www.jstor.org/stable/23001938
५.रेगे शर्मिला (१९९९), प्रेमाचा अधिकार आणि हिंसेचा प्रश्न, सत्यशोधक विद्यार्थी संघटना प्रकाशन, पुणे,.
[1] पद्यूत्तर विद्यार्थी,
इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पुणे.
[2]
पोट येणे हे अविवाहित
मुलींच्या संदर्भात वापरले जाते. गरोदर असण्यालाच आपल्याकडे समाजमान्यता असते.