तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.
राज (राज कपूर) हा अलाहाबादचा एक गरीब-खेडूत मुलगा उदरनिर्वाहासाठी पायी चालत मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातो. मुंबईत राज गरीब व सद्गुणी विद्या (नर्गिस) च्या प्रेमात पडतो, राज पुढे एका बेईमान व्यापारी, सेठ सोनाचंद धर्मानंद (निमो) आणि माया (नादिरा) यांच्या अनैतिक जुगरांच्या नादी लागतो. विद्या राजला चांगला माणूस बनवण्याचा खूप प्रयत्न करते पण तिचे प्रयत्न फसतात.
![]() |
| राज आणि विद्या |
राज लोकांच्या घराची कागदपत्रे बाँड पेपर्स घेतो आणि सोनचंदच्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु सोनाचंद आणि त्याचे साथीदार त्याला पकडतात. यात सोनचंदन राजवर गोळी झाडतो व तो बेशुद्ध पडतो. लोकं गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे येतात तेव्हा राज त्याना बेशुध्द दिसतो, सोनाचंद पोलिसांना सांगतो कि राज त्यांच्या तीजोरीतीला पैसे चोरून नेत असल्याने त्याने गोळी झाडली.
अशात "मृत" राज पुन्हा जिवंत होतो आणि सोनाचंद कशाप्रकारे लोकांची लुट करण्याचं प्रयत्न करत होता हे सर्व लोकांसमोर सिद्ध करतो. सोनचंद आणि त्याच्या साथीदारांना अटक केली जाते, तर विद्या राजला आनंदाने माफ करते. सोनाचंद सारखी लोकं ४२० नाही तर श्री ४२० आहेत असं राज शेवटी म्हणतो.
शेवटी सर्वांकडून जमा केलेले एक करोड सत्तर लाख रुपये आपल्याकडे आहेत. आपण सरकार दरबारी जाऊन जमिनीची मागणी करूया, आमच्या श्रमाने घरं उभारू अशी मागणी आपण करू शकतो अशा सूचक आशयावर हा चित्रपट संपतो. शेवटी पुन्हा ‘मेरा जुता है जपानी' हे गाणं लागतं, "मंजील कहा कहां रुकना है, उपर वाला जाने, बढते जाये हम सैलानी जैसे एक दरिया तुफानी" असं म्हणता म्हणता गरिबांची घरं तायार झालेली असतात. अशाने चित्रपटाची सांगता होते. ही ‘मंजील’ म्हणजे सामुहिक श्रम आणि सहकार यावर आधारित समाजवादी स्वप्न असा अर्थ घेतला पाहिजे.
![]() |
| सेठ सोनाचंद |
सत्तर वर्षांनंतर सेठ सोनाचंदच्या हवेलीची जागा आता अक्राळविक्राळ उत्तर आधुनिक अशा बिल्डिंग ने घेतली आहे, त्यातील दरवाजे आणि खिडक्यांचाही भेद करता येत नाही, असं असतानाही ते बंगले वास्तुशास्त्रानुसार बनवले आहेत असं म्हणतात. सावकारी करून चक्रवाढ व्याजावर ताव मारणारे सोनाचंद आता दलाल स्ट्रीट वर डेली ट्रेडिंग करतात, आपीपीएलच्या मॅच चे spectacle सुरू असतानाही मालकांवर कॅमेरा असावा असा त्यांचा दंडक आहे, लालबागच्या गणपती समोर आताचे सोनाचंद कशाप्रकारे हात जोडतात त्याची दिशा कशी असते, त्याची मुद्रा काय असावी यावर लोकं रील बनवतात. श्रीमंतीची अभिलाषा असणारे कनिष्ठ मध्यमवर्गीय पुन्हा पुन्हा तीच रील पाहून त्याच मुद्रेत देवाची प्रार्थना करतात, त्यांना सोनाचंद आपला वाटू लागला आहे, त्याच्या मोठमोठ्या गाड्यांच्या, त्यांच्या कपड्यांचे, त्यांच्या लग्नाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या समारोहाचे आजचे राज चाहते झाले आहेत. सोनाचंदने जवळपास सर्व वृत्तपत्रे आणि डिजिटल मिडिया आपल्या खिशात घातले आहेत. सोनाचंद आता त्यांच्या कॉफी टेबल वरच्या चर्चेचा विषय बनला आहे, तर झोपडपट्टीतल्या लोकांना सोनाचंद कशाप्रकारे हत्तीला खिचडी खाऊ घालतो या त्याच्या भूतदयेविषयी कणव वाटते. सोनचंदकडे आपले "शंभर रुपये" (अर्थात त्यांचे कवडीमोल श्रम, मोठमोठी जंगलं त्यातील प्राणी, लीज वर दिलेले भूखंड इ.) दिलेल्या जनतेत आणि सोनाचंदमध्ये हा रोजचा रील संवाद होत असतो. यासाठी सोनाचंदने त्यांना आधी काही महिने फुकट इंटरनेटही दिलं, जनतेला त्याची सवय झाल्यावर मग इंटरनेट जगात आपली मक्तेदारी निर्माण करत भाववाढ करून वसुलीही केली. सोनाचंदच्या अल्गोरिदम मुळे राज ला कुठल्याच "मंजिल" चे भान येत नाहीये, असा दिगभ्रमित राज इतिहासाच्या हिंसेत, सूडभावनेत, नैराश्यात, वृथा अभिमानात आणि न्यूनगंडात एकाच वेळी वावरत असतो. असा मंजिलहीन राज जरी म्हणत असला "हम सिंघासन पर जा बैठे जब जब करे इरादे" तरी हा इरादा फक्त वल्गना ठरतायत असं आजुबाजूचं वास्तव आहे.
टीप- श्री ४२० सिनेमाने १९४५ नंतरची मुंबई, भष्टाचार आणि भांडवलसंचायनावर जो प्रकाश टाकला आहे त्यासंबंधी सिनेमा अभ्यासक आशिष राज्याध्यक्ष यांनी 'फ्रंटलाईन' पाक्षिकात एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. तो इथे वाचायला मिळेल.
-फ्लॅन्यूअर, मुंबई. जून २०२६.

.webp)
