“रोता हुआ पुरुष इस सृष्टि का सबसे दुर्लभ दृश्य है” असं एकेठिकाणी वाचलं. त्यावर थोडा विचार केल्यानंतर आठवलं कि बंजारा समाजातील लग्नात एका विधीदरम्यान नवरदेवाने आपल्या आई, बहिण, आत्या, काकू, आजी यांना मिठी मारून रडावं अशी प्रथा आहे. त्या समुहात ही खरंतर कुठल्याही मुलाच्या आयुष्यात एकदाच घडणारी घटना असते या व्यतिरिक्त कधीही सामूहिकरीत्या रडण्याची काही सोय पुरुषांना नसते, तर जाणून घेऊया या अनोख्या विधीविषयी. या रूढीतील तपशिलासहच मानवशास्त्राच्या सिद्धांतातून काही स्पष्टीकरणे मिळतात का याचाही अंदाज घेऊ. अर्थात सर्वच मानवी व्यवहार तंतोतंत सिद्धांतात पकडता येतात असं नाही, परंतु त्या दिशेने काहीएक प्रयत्न करता येईल. साधारणतः आपण मुलींच्या विदाई विषयी ऐकलं असेल परंतु बंजारा समाजात मुलांचीही ‘वदई’ होत असते, ती ‘वदई’ करताना नवरदेव आणि लहान भावाच्या दंडाला सुईचा चटका देतात. खालील गाणं सात वेळा म्हणतात, तोवर सुई दिव्याचा आचेवर तापवली जाते.
कुळी आवं कुळी
जावं, (कुळ येतं, कुळ जातं)
कुळी माई जोत
समावं, (कुळामध्ये ज्योत सामावली जाते)
माई पूजा माई
पतडी (त्यात पूजा, त्यात पतडी)
पूजण वाळो हार,
(पुजेसाठीचा हार)
धोळो घोडो हासलो
(पांढरा घोडा देखणा)
पातळीया सवार
(त्यावर सवार पातळ)
मुंगे आवडा
मोगरा (मुंगेएवढा (मुंगेच्या दाण्याएवढा) मोगरा)
तल्ली आवडी कवाड
(तिळाएवढी कवाड (दार))
राम छ क रूप
छ (राम आहे कि रूप आहे)
कूण छ कुवारो
(कोण आहे कुंवारा)
बेटा लार बोडी
आवं (मुलामागे सून येते)
गोसाई बाबा साई हेव (गोसाई बाबा कृपा कर)
साधारण भटक्या जमातीय जीवनाविषयी काहीतरी
संगाणारे आणि रूपकांचा वापर करून आपल्या आसपासच्या गोष्टींचा अर्थ लावून केली
गेलेली ही प्रार्थना आहे. चटका देऊन झाल्यावर मुलाला घराबाहेर काढलं जातं, (मग
तिसऱ्या दिवशी जेव्हा मुलगा लग्न करून मुलीला घेऊन घरी परत येतो तेव्हाच त्याला
घरात परत घेतलं जातं) घराबाहेर काढल्यावर लागलीच जो विधी असतो त्यात बायका जमून
‘टेळो’ म्हणतात, टेळो म्हणजे स्त्रियांनी विशिष्ट लयीत गायलेली सामुहिक गाणी. या
प्रसंगी जी गाणी असतात त्यांचा आशय साधारणत: मुलाला भावनिक साद घालणारा असतो.
त्याला ‘वदाव’ म्हणतात यात आई आणि लेकराचा करुण संवाद आहे. हा संवाद म्हणजे मुलगा
आता गृहस्तीत प्रवेश करणार असल्याने त्याची आई आणि पैतृक कुटुंबाने व्यक्त
केलेल्या चिंतेचं (anxieties) चे प्रत्यंतर त्यात आहे.
वेगो तो आरे
मारा लाडला (परत
ये रे माझ्या लाडक्या)
तारी मावड जोव छ
वाट (तुझी
आई बघते वाट)
आब कसो आऊ मारी
मावड (आता
कसं येऊ आई)
सासू साळी सी
लागी परीत (सासू-मेहुणी सोबत लागली प्रीत)
पपीया बोल (बोले पापिहा मोर)
धड रे मुंड मावड
बेट जो (इकडे दाराकडे ये
आई)
माळवी र मुंडो ए
मावड खोल द (तुझ्याकडची
पिशवी खोल)
सेला ए मोळ्या
वालान काड द (माझ्यासाठी शेला
आणि बाशिंग काढून ठेव)
चंची न सरोता
वाला न काड द (चंची आणि सरोता
(सुपारीचा अडकिता) काढ)
वाला तो चालो
हिरे (रांझा) रे देस (तुझा लाडका निघतोय
हिर (रांझा ची हिर) च्या देशा)
वाला तो चालो पंजाबी देस (तुझा लाडका निघाला पंजाबी देश)
पुढील अनेक गाण्यांचा आशय काहीसा नाळ तुटण्यासारखी आहे. मुलाची नाळ हि दोन वेळा तुटते, एकदा जैविक अर्थाने जन्म होतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा लग्न होतं तेव्हा, त्यामुळे या भावनिक संवादाची तीव्रता फार जास्त आहे. या नंतर मुलाच्या गळ्यात पडून आई, आत्या, बहिण, काकू रडतात. आता तो मुलगा परका होईल, आज आपल्या घरातील हि व्यक्ती असती तर तिला किती आनंद झाला असता अशा आशयाचे ‘ढावलो’ (दुःखगीते) रडतांना गायले जातात. हि गाणी ऐकून क्वचितच असा एखादा मुलगा असतो ज्याला रडायला येत नाही. या निमित्ताने स्त्रिया आपल्या रोजच्या जगण्यातील दु:खाला वाट मोकळी करत असतात. याशिवाय मुलांच्याही दुःखाचे विरेचन होत असते.
मित्राच्या लग्नप्रसंगी झालेल्या वदई प्रसंगी गायलेली दुःखगीतेवराला स्त्रियांना मिठी मारायला लावणे, दुःखगीते म्हणणे, सामूहिक रडणे, दडपलेल्या आठवणी आणि वेदना सार्वजनिकपणे व्यक्त करणे इत्यादी. वरवर पाहता हे केवळ भावनिक दृश्य आहेत असं वाटू शकतं. पण समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय नजरेतून पाहिले तर हा केवळ भावनांचा उद्रेक नाही तर तो एका सामाजिक संक्रमणाचा आणि दडपलेल्या भावभावना आणि स्मृती दृश्यमान होण्याचा क्षण असतो. व्हिक्टर टर्नर या अभ्यासकाने ने Liminality (उंबरठ्याची किंवा संक्रमणाची अवस्था) ही संकल्पना मांडली आहे. काही सामाजिक विधी माणसाला जुन्या आणि नव्या सामाजिक ओळखीच्या मधल्या अवस्थेत आणून उभे करतात. या अवस्थेत माणूस ना पूर्णपणे जुना राहतो, ना पूर्णपणे नवा बनतो तर तो एका सीमारेषेवर उभा असतो. लग्नातील वरही अशाच अवस्थेत असतो. या संक्रमण अवस्थेत तो केवळ मुलगा राहिलेला नसतो परंतु पूर्णपणे पतीही झालेला नसतो. तो एका सामाजिक उंबरठ्यावर उभा असतो. या क्षणी त्याच्यावर नेहमीच्या सामाजिक अपेक्षा तात्पुरत्या सैल होतात.
परंतु हा विधी केवळ वराच्या संक्रमणाचा
आहे असंच मानायला पाहिजे का ? कारण या विधीत स्त्रियांचे सामूहिक रडणे, गाणी म्हणणे आणि दडलेल्या भावनांना सार्वजनिक रूप देणे याचाही अंतर्भाव होतो.
पितृसत्ताक समाजात स्त्रियांचा दुःखानुभव हा व्यक्तिगत असतो. संसाराचे रहाटगाडे,
माहेरपासूनचे तुटणे, रोजमार्राचे दुय्यमत्व,
आयुष्यभरातील दडपलेले दु:खानुभव या सर्व गोष्टी कुटुंबसंस्थेच्या
तटबंदीत दफन केलेल्या असतात. एका ढावलो मध्ये म्हणतात तसं
पाड बळं विरणा
सारीन दिकं, आत्मा बळं केन दिकं, पाडेरो धुवा विरणा सर्गे पुचं, मनेरो धुवा मनमं
रेवं
डोंगर जळतं ते सर्वांना
दिसतं, माझा आत्मा जळतो ते कोणाला दिसेल, डोंगराचा धूर स्वर्गात पोचतो, माझ्या
मनातील धूर मनातच धुमसतो
या दडपलेल्या भावना अचानक या विधीत सामूहिक
होतात. टर्नर याला Anti-Structure
(सामान्य सामाजिक संरचनेचे तात्पुरते स्थगन) म्हणतो. या विशिष्ट काळात
काही नियम तात्पुरते बाजूला ठेवले जातात. पुरुषाला रडण्याची परवानगी मिळते. स्त्रियांना
व्यक्त होण्याची मुभा असते. दुःख दडपवण्याची सक्ती थोडा वेळ का होईना थांबते.
टर्नर आपल्याला हि संक्रमणावस्था समजण्यास मदत करतो, परंतु या भावनांना आवाज विशिष्ट
क्षणीच का मिळतो हे समजून घेण्यास आपल्याला बोर्दुयू ची Habitus ही संकल्पना उपयुक्त ठरेल. Bourdieu च्या Habitus
(सामाजिक सवयींची शरीरात बसलेली रचना) या संकल्पनेतून पाहिले तर
समाज केवळ नियमांचा समुच्चय नसतो तर ते नियम आपल्या शरीरमानाचा ताबा घेतात. कसे
बसायचे, कसे चालायचे, कधी बोलायचे,
कधी गप्प राहायचे, पुरुषांनी कधी रडायचे नाही,
स्त्रियांनी किती दुःख व्यक्त करायचे या सर्व बाबींचा अंगीकार आपण करत
असतो. पितृसत्तेने निर्माण केलेल्या या habitus मध्ये
तात्पुरती फट म्हणून आपण या विधीकडे पाहू शकतो.
तात्पुरता का होईना सामाजिक नियम मोडले
जात असतील, तर हा विधी संपल्यानंतर काय होते? इथे Catherine
Bell यांनी मांडलेली Ritualization (विधीद्वारे
सामाजिक अर्थनिर्मिती) या संकल्पनेतून याचे काही स्पष्टीकरण आपल्याला मिळते. Bell
च्या मते विधी हा केवळ परंपरेचा पुनरुच्चार नसतो; तो समाज स्वतःला समजावण्याचा मार्ग असतो. काही कृतींना विशेष अर्थ देऊन
समाज स्वतःची पुनर्रचना करत असतो. मग कदाचित हा विधी एका वेगळ्याच पद्धतीने काम
करत असेल असा अंदाज बांधता येऊ शकतो. इथे स्त्रियांना दुःख व्यक्त करण्याची जागा
मिळते, पण त्याचवेळी त्या दुःखाला एका ठराविक क्षणात त्या त्या विधीपुरता बंदिस्त
आणि मर्यादितही केलं जातं. इथे पुरुषाला रडू दिलं जातं परंतु लगेचच त्याच्याकडून
कठोरपणाची अपेक्षा केली जाते. म्हणजेच या विधीत विधी तात्पुरते नियम शिथिल केले
जातात पण त्यानंतर त्याच सामाजिक राहाटगाड्यात जावं लागतं.


.jpeg)