Tuesday, March 29, 2022

मोहब्बत है क्या चीज़ ?


समस्त मानवांसाठी प्रेमाचा शोध हा न संपणारा प्रवास राहिलेला आहे. प्रेम एक भ्रम आहे म्हणून त्याला दुषणे द्यावीत की मानवी जीवनाचा गाभा म्हणून त्याचा गौरव करावा?, मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्राइड यांच्या मते, प्रेम म्हणजे परस्परावलंबन होय -एखादं बाळ ज्या प्रकारे आपल्या आईवर अवलंबून असतं, तसं. एडमंड बर्ग्लर या मनोविश्लेषकाच्या (Psychoanalyst) मते प्रेम म्हणजे प्रेम करवून घेण्याची आकांक्षा तेवढी असते. मग आता प्रेमाला आत्मरत किंवा आत्ममग्न असणं (narcissistic) म्हणावं की सृजनशील म्हणावं हाही प्रश्न उद्भवतो. जेकस लाकॉं हे तत्वज्ञ प्रेमाला अभावातून निष्पन्न झालेली गोष्ट मानतात तर एरिक फ्रॉम या मानसशास्त्रज्ञाच्या मते मानवी अस्तित्वाच्या प्रश्नाचे उत्तर फक्त प्रेमात आहे. एकीकडे प्रेमामध्ये सर्व प्रकारची अंतरं कापली जाऊ शकतात, परस्परांमधल्या भिंती पाडल्या जाऊ शकतात असं म्हटलं जातं तर दुसरीकडे प्रेमामध्ये स्वतः ची फसवणूक असते असंही काहींचं मत आहे. प्रेमाबद्दलचे हे द्वैत आजतागायत कायम आहे. त्यामुळेच एकविसाव्या शतकात सारा एव्हान्स सारखी गायिका गाण्यातून “व्हाट लव्ह रियली मिन्स?” असा प्रश्न विचारताना दिसते. असं असलं तरीही तत्वज्ञ आणि अभ्यासकांनी प्रेमाचा अर्थ लावलेला आहे. प्रेमाची एकच एक व्याख्या किंवा कल्पना असू शकत नाही. व्यक्तीपरत्वे त्याच्या कल्पना आणि धारणा बदलत जातात. प्रस्तुत लेखात प्रेमाच्या तात्विक चर्चेचा आढावा आणि प्रेमविषयक धारणांचं सतत विस्तारणारं क्षितीज याची चर्चा करणार आहोत. 

प्रेमाचा गाभा :
प्रेम हे तत्व मानवतेचा गाभा मानलं जातं. प्रेमाशिवाय मानवता संदर्भहीन असेल. दोन व्यक्तींमध्ये असणारं प्रेम म्हणजे प्रेम अशी जी एक सर्वसामान्य समजूत आहे तसं न बघता प्रेमाला त्याच्या वैश्विक स्वरूपात आणि समग्रतेत बघितलं पाहिजे. प्रेमामध्ये सर्व प्रकारचं अंतर कापण्याची क्षमता असते, माणसा-माणसांना दूर करणाऱ्या सर्व भिंती पाडून टाकण्याची क्षमता असते. म्हणूनच जगभरात अशा प्रेमकहाण्यांची स्मृती जागवली जाते.  अॅलन बाद्यू हा फ्रेंच तत्वज्ञ म्हणतो की अशक्य वाटणारी गोष्ट साध्य करून दाखवणारं प्रेम, हे एक वैश्विक मानवी मूल्य आहे. हे मूल्य म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे सर्व भेद, अंतर कापून मानवतेला गवसणी घालणं. ही अंतरं कमी होऊन प्रेमातून ‘समता’ (Equality) साधली जाते. आपल्या आजूबाजूला प्रेमाच्या या मूळ तत्वाच्या उलट काही गोष्टी घडत असतात. आपल्या समाजरचनेतून ते घडलेलं असतं. उदाहरणार्थ, कॉर्पोरेट संस्कृतीच्या व्याखेत जे देवाण-घेवाणीचं तत्व आहे त्यानुसार इथे समतेचा अर्थ ‘सारखेपणा’ असा घेतला जातो. म्हणूनच ‘सोल मेट’ नावाची कल्पना या रचनेमध्ये चलनात येते. आपल्यासारखंच कोणीतरी एक्स्चेंज पॅकेज शोधण्याला यात प्राधान्य असतं. प्रेमाला पारखं होण्याची समस्या समाजवास्तवामुळे उद्भवलेली असते, तसंच प्रेमाला मुळातून समजून न घेतल्यामुळे सुद्धा या समस्येत भर पडते, असं एरिक फ्रॉम हे मानसशास्त्रज्ञ मानतात. या समस्येची उकल करण्यासाठी प्रेम म्हणजे काय, हे समजून घेणं महत्वाचं ठरेल. 
स्वतःवरच्या प्रेमाची मर्यादा ओलांडून माणसाचचं एकाकीपण आणि अलगपणाच्या  भावनांवर मात करण्याची क्षमता प्रेमात असते, प्रेमामध्ये दोन व्यक्ती एकत्र येतात, एकमेकांशी तादात्म्य पावतात तरीही दोघांचं व्यक्तिमत्व आणि स्वत्व अबाधित राहतं. हे वरवर बघता विरोधाभासी वाटेल, पण प्रेम हे अनिवार्यपणे स्वातंत्र्याचं अपत्य असल्यामुळे खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यातच प्रेम आकाराला येऊ शकतं, म्हणून दोन व्यक्ती एकत्र येतात मात्र त्यातही आपलं स्वत्व (म्हणजे आपलं असणं) जपतात.  प्रेम म्हणजे आपल्याकडलं काहीतरी वाटून घेणं असतं, सातत्याने इतरांसोबत काहीतरी वाटून घेत राहण्यात प्रेमाचं सार्थक असतं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व प्रकारच्या आर्थिक-सामाजिक विषमता अनेकांना ‘वाटून घेण्या’ पासून वंचित ठेवतात, त्याच अर्थाने प्रेमालाही पारखं करतात. उदाहरणार्थ, स्पर्धेची चढाओढ आपल्याला इतरांप्रती करुणा बाळगू देत नाही किंवा आर्थिक दारिद्र्य वेगळ्या प्रकारे काहीतरी देण्यापासून वंचित करत असतं. आजच्या एकूणच कॉर्पोरेट विचारात काहीतरी (भावनिक-आर्थिक) दिल्यानंतर काहीतरी मिळण्याची अपेक्षा ठेवली जाते. देण्याच्या मोबदल्यात काही मिळालं नाही तर त्याला ‘फसवणूक’ (cheating) समजलं जातं. 
सृजनशीलतासुद्धा प्रेमाचंच अपत्य आहे. काहीतरी सृजन घडविण्यासाठी कष्ट करण्यातच प्रेमाचं सार आहे. ज्यावर आपलं प्रेम असतं त्यासाठीच हे सृजनाचे कष्ट घेतले जातात. एरिक फ्रॉम यांच्या मते, यासाठी चार मूल्यांची आवश्यकता असते: काळजी, जबाबदारी, आदर आणि ज्ञान. ही चारही मूल्यं एकमेकांवर अवलंबून असतात. काळजी म्हणजे ज्यावर आपलं प्रेम आहे त्याचा विकास व्हावा, सातत्याने त्याची वाढ व्हावी याबद्दलची काळजी. आपलं ज्यावर प्रेम आहे त्याला वाढवण्यासाठी मनुष्य श्रम करतो. मग ती काळजी फक्त त्या-त्या व्यक्तीबद्दल न राहता व्यापक मानवतेबद्दलची सुद्धा काळजी असते. जबाबदारीचा अर्थ हल्ली कर्तव्य असा घेतला जातो, परंतु जबाबदारी म्हणजे स्वयंस्फूर्तीने करायची गोष्ट असते, म्हणून आपल्या सोबतच्या माणसाच्या अव्यक्त गरजांना प्रतिसाद देणं असा अर्थ जबाबदारी मध्ये अभिप्रेत आहे. जबाबदारी सोबत आदर हे मूल्य नसलं तर जबाबदारीचं रुपांतर संबंधित व्यक्तीवर अधिकार किंवा सत्ता गाजवण्यात होऊ शकतं. आदर म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आदर करणं होय. ती व्यक्ती आपल्या स्वयंप्रज्ञेने आपला विकास साधू शकते, आपलं अस्तित्व शोधू शकते याबद्दल आस्था असणं. या आदरभावात सत्ता गाजविणं किंवा मतं थोपविणं यांना अज्जिबात स्थान नसतं. म्हणून इथेसुद्धा स्वातंत्र्याला महत्व आहे. स्वातंत्र्य असलं तरच आदरभाव विकसित होऊ शकतो.  कोणतंही ज्ञान साररूपाने ग्रहण करणं हे प्रेमाच्या आधारेच शक्य होत असतं. जेव्हा दोन व्यक्ती प्रेमाच्या प्रक्रियेत एकरूप होतात तेव्हा प्रिय व्यक्ती सोबत स्वतःचाही आंतरिक शोध घेतात. या शोधाच्या प्रक्रियेत मानवतेचा साक्षात्कार होतो. म्हणूनच प्रेम म्हणजे स्वातंत्र्य आणि करुणामय मानवी जीवनाला होकार असतो.  
प्रेमाचं विस्तारणारं क्षितीज:  प्रेमाबाद्दलची तात्विक चर्चा आपण प्राथमिक स्वरूपात केली आहे. त्याला मूर्त रूप देण्यासाठी आस्था आणि धाडस या मूल्यांची आवश्यकता असते. आपल्या प्रेमाने सोबतच्या लोकांमध्येही प्रेमभावना वाढत जाईल या गोष्टीवर आस्था असली तर प्रेम हे विस्तारत जाणाऱ्या क्षितिजाप्रमाणे होते. स्वतःला कुरवाळत बसण्याच्या भावनेतून वर उठणं, सत्ता गाजवण्याचा सोस सोडणं आणि खऱ्या अर्थाने माणूस बनणं यासाठी धाडस करावं लागतं.
आपण आपल्या आजूबाजूला नजर फिरवली तर लक्षात येईल की, समजातील आर्थिक- सामाजिक विषमता तसंच पारंपारिक मूल्यं आपल्याला प्रेम करण्यापासून पारखं करतात. उदाहरणार्थ, जातींच्या बंधनामुळे आपला माणूस म्हणून संकोच होतो. आपण एका विशिष्ट समूहापूरते मर्यादित राहिल्यामुळे प्रेम आणि मैत्रीला मुकतो, पर्यायाने मानवतेलाही मुकतो. जातीय-धार्मिक तटबंदी, सत्तेची स्पर्धा, नफ्या-तोट्याचा विचार आणि भौतिक हव्यास या गोष्टी माणसांच्या मनाचं रूपांतर यंत्रात करत असतात. यांत्रिक पद्धतीने विचार केल्यामुळे सर्वच गोष्टींकडे व्यावहारिक पद्धतीने बघितलं जातं. या प्रक्रियेत माणूसही स्वतःकडे वस्तू (commodity) म्हणून बघतो आणि इतरांकडेही वस्तू म्हणूनच बघितलं जातं. डेटिंग अॅपवर प्रेम ‘शोधण्याला’ रिस्क फ्री लव्ह (जोखीमविरहित प्रेम) समजलं जातं, कारण त्यात ना मनुष्यत्वाचा शोध घेणारी प्रेमाप्रतीची आस्था असते ना धाडस करण्याची प्रवृत्ती असते. प्रेमाची कल्पना ही आपल्या आजूबाजूच्या परिवेशाने घडवलेली असते. त्यामुळेचं सर्वसामान्यरित्या प्रेमात ‘व्यवहार’ दिसून येतो. आनंद बक्षी म्हणतात तसं ‘मोहब्बत अब तिजारत (व्यापार) बन गई है, तिजारत अब मोहब्बत बन गई है’ l
चित्रपट, कविता आणि नाटकांमध्ये प्रेमाची शक्यता पदोपदी दिसत राहते. वास्तविक जीवनातील सर्व भेद, विषमता आणि अंतर कापून प्रेम करणं शक्य नसल्यास पडद्यावर किंवा साहित्यात प्रेमाचा शोध घेतला जातो. यातून एक स्पष्ट होतं की, बहुसंख्य लोकांच्या मनात प्रेमाबाद्दल आस्था आहे परंतु विषमता, सामाजिक–आर्थिक भेद, लैंगिकतेच्या धारणा इत्यादींमुळे ते शक्य होत नाही. म्हणून प्रेमाविषयी आस्था असणाऱ्या लोकांनी हे भेद आणि विषमता कशा दूर होतील यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कारण स्वातंत्र्य आणि समतेच्या परिवेशातच प्रेम बहरू शकतं, वैश्विक होऊ शकतं. फ्रेडरिक नित्शे हा तत्वज्ञ म्हणतो की, माणूसपणाचा अर्थ प्रेमाविषयीच्या आस्थेत आहे. त्यामुळे मानवी दु:ख आणि अस्तित्वाच्या प्रश्नाला प्रेम हेच एकमेव उत्तर आहे असं फ्रॉम म्हणतो ते यथार्थच आहे. प्रेमाची उकल करणारं बॉब मार्लीचं एक गाणं आहे, त्यात तो म्हणतो- ‘वन लव्ह, वन हार्ट, लेट्स गेट टुगेदर अॅण्ड फील ऑलराईट.’

© सागर नाईक
sagarnaik4511@gmail.com
संपर्क - 9511265803

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...