Friday, June 19, 2026

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता. 

राज (राज कपूर) हा अलाहाबादचा एक गरीब-खेडूत मुलगा उदरनिर्वाहासाठी पायी चालत मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातो. मुंबईत राज गरीब व सद्गुणी विद्या (नर्गिस) च्या प्रेमात पडतो, राज पुढे एका बेईमान व्यापारी, सेठ सोनाचंद धर्मानंद (निमो) आणि माया (नादिरा) यांच्या अनैतिक जुगरांच्या नादी लागतो. विद्या राजला चांगला माणूस बनवण्याचा खूप प्रयत्न करते पण तिचे प्रयत्न फसतात. 

दरम्यान, सोनचंद गरीब लोकांचे शोषण करण्यासाठी एक योजना आणतो, याद्वारे तो गरिबांना फक्त १०० रु. मध्ये कायमस्वरूपी घरं देण्याचं आश्वासन देतो. अशा अनैतिक कामांमध्ये गुंतल्याने विद्याचा राजबद्दलची तिरस्कार आणखीनच वाढत जातो. राज श्रीमंत होतो पण त्याला याची फार मोठी किंमत मोजावी लागली हे त्याच्या लवकरच लक्षात येतं. सोनचंदची आश्वासने पूर्ण करण्याची कोणतीही योजना नसून तो गरिबांची फसवणूक करत आहे हे कळल्यावर राज आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. 
राज आणि विद्या

राज लोकांच्या घराची कागदपत्रे बाँड पेपर्स घेतो आणि सोनचंदच्या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु सोनाचंद आणि त्याचे साथीदार त्याला पकडतात. यात सोनचंदन राजवर गोळी झाडतो व तो बेशुद्ध पडतो. लोकं गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे येतात तेव्हा राज त्याना बेशुध्द दिसतो, सोनाचंद पोलिसांना सांगतो कि राज त्यांच्या तीजोरीतीला पैसे चोरून नेत असल्याने त्याने गोळी झाडली.

अशात "मृत" राज पुन्हा जिवंत होतो आणि सोनाचंद कशाप्रकारे लोकांची लुट करण्याचं प्रयत्न करत होता हे सर्व लोकांसमोर सिद्ध करतो. सोनचंद आणि त्याच्या साथीदारांना अटक केली जाते, तर विद्या राजला आनंदाने माफ करते. सोनाचंद सारखी लोकं ४२० नाही तर श्री ४२० आहेत असं राज शेवटी म्हणतो.

शेवटी सर्वांकडून जमा केलेले एक करोड सत्तर लाख रुपये आपल्याकडे आहेत. आपण सरकार दरबारी जाऊन जमिनीची मागणी करूया, आमच्या श्रमाने घरं उभारू अशी मागणी आपण करू शकतो अशा सूचक आशयावर हा चित्रपट संपतो. शेवटी पुन्हा ‘मेरा जुता है जपानी' हे गाणं लागतं, "मंजील कहा कहां रुकना है, उपर वाला जाने, बढते जाये हम सैलानी जैसे एक दरिया तुफानी" असं म्हणता म्हणता गरिबांची घरं तायार झालेली असतात. अशाने चित्रपटाची सांगता होते. ही ‘मंजील’ म्हणजे सामुहिक श्रम आणि सहकार यावर आधारित समाजवादी स्वप्न असा अर्थ घेतला पाहिजे.  

सेठ सोनाचंद

सत्तर वर्षांनंतर सेठ सोनाचंदच्या हवेलीची जागा आता अक्राळविक्राळ उत्तर आधुनिक अशा बिल्डिंग ने घेतली आहे, त्यातील दरवाजे आणि खिडक्यांचाही भेद करता येत नाही, असं असतानाही ते बंगले वास्तुशास्त्रानुसार बनवले आहेत असं म्हणतात. सावकारी करून चक्रवाढ व्याजावर ताव मारणारे सोनाचंद आता दलाल स्ट्रीट वर डेली ट्रेडिंग करतात, आपीपीएलच्या मॅच चे spectacle सुरू असतानाही मालकांवर कॅमेरा असावा असा त्यांचा दंडक आहे, लालबागच्या गणपती समोर आताचे सोनाचंद कशाप्रकारे हात जोडतात त्याची दिशा कशी असते, त्याची मुद्रा काय असावी यावर लोकं रील बनवतात. श्रीमंतीची अभिलाषा असणारे कनिष्ठ मध्यमवर्गीय पुन्हा पुन्हा तीच रील पाहून त्याच मुद्रेत देवाची प्रार्थना करतात, त्यांना सोनाचंद आपला वाटू लागला आहे, त्याच्या मोठमोठ्या गाड्यांच्या, त्यांच्या कपड्यांचे, त्यांच्या लग्नाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या समारोहाचे आजचे राज चाहते झाले आहेत. सोनाचंदने जवळपास सर्व वृत्तपत्रे आणि डिजिटल मिडिया आपल्या खिशात घातले आहेत. सोनाचंद आता त्यांच्या कॉफी टेबल वरच्या चर्चेचा विषय बनला आहे, तर झोपडपट्टीतल्या लोकांना सोनाचंद कशाप्रकारे हत्तीला खिचडी खाऊ घालतो या त्याच्या भूतदयेविषयी कणव वाटते. सोनचंदकडे आपले "शंभर रुपये" (अर्थात त्यांचे कवडीमोल श्रम, मोठमोठी जंगलं त्यातील प्राणी, लीज वर दिलेले भूखंड इ.) दिलेल्या जनतेत आणि सोनाचंदमध्ये हा रोजचा रील संवाद होत असतो. यासाठी सोनाचंदने त्यांना आधी काही महिने फुकट इंटरनेटही दिलं, जनतेला त्याची सवय झाल्यावर मग इंटरनेट जगात आपली मक्तेदारी निर्माण करत भाववाढ करून वसुलीही केली. सोनाचंदच्या अल्गोरिदम मुळे राज ला कुठल्याच "मंजिल" चे भान येत नाहीये, असा दिगभ्रमित राज इतिहासाच्या हिंसेत, सूडभावनेत,  नैराश्यात, वृथा अभिमानात आणि न्यूनगंडात एकाच वेळी वावरत असतो. असा मंजिलहीन राज जरी म्हणत असला "हम सिंघासन पर जा बैठे जब जब करे इरादे" तरी हा इरादा फक्त वल्गना ठरतायत असं आजुबाजूचं वास्तव आहे.


टीप- श्री ४२० सिनेमाने १९४५ नंतरची मुंबई, भष्टाचार आणि भांडवलसंचायनावर जो प्रकाश टाकला आहे त्यासंबंधी सिनेमा अभ्यासक आशिष राज्याध्यक्ष यांनी 'फ्रंटलाईन' पाक्षिकात एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. तो इथे वाचायला मिळेल. 

-फ्लॅन्यूअर, मुंबई. जून २०२६.



Saturday, May 30, 2026

वाला तो चालो हिरे रे देस..

“रोता हुआ पुरुष इस सृष्टि का सबसे दुर्लभ दृश्य है” असं एकेठिकाणी वाचलं. त्यावर थोडा विचार केल्यानंतर आठवलं कि बंजारा समाजातील लग्नात एका विधीदरम्यान नवरदेवाने आपल्या आई, बहिण, आत्या, काकू, आजी यांना मिठी मारून रडावं अशी प्रथा आहे. त्या समुहात ही खरंतर कुठल्याही मुलाच्या आयुष्यात एकदाच घडणारी घटना असते या व्यतिरिक्त कधीही सामूहिकरीत्या रडण्याची काही सोय पुरुषांना नसते, तर जाणून घेऊया या अनोख्या विधीविषयी. या रूढीतील तपशिलासहच मानवशास्त्राच्या सिद्धांतातून काही स्पष्टीकरणे मिळतात का याचाही अंदाज घेऊ. अर्थात सर्वच मानवी व्यवहार तंतोतंत सिद्धांतात पकडता येतात असं नाही, परंतु त्या दिशेने काहीएक प्रयत्न करता येईल. साधारणतः आपण मुलींच्या विदाई विषयी ऐकलं असेल परंतु बंजारा समाजात मुलांचीही ‘वदई’ होत असते, ती ‘वदई’ करताना नवरदेव आणि लहान भावाच्या दंडाला सुईचा चटका देतात. खालील गाणं सात वेळा म्हणतात, तोवर सुई दिव्याचा आचेवर तापवली जाते.

कुळी आवं कुळी जावं, (कुळ येतं, कुळ जातं)

कुळी माई जोत समावं, (कुळामध्ये ज्योत सामावली जाते)

माई पूजा माई पतडी (त्यात पूजा, त्यात पतडी)

पूजण वाळो हार, (पुजेसाठीचा हार)

धोळो घोडो हासलो (पांढरा घोडा देखणा)

पातळीया सवार (त्यावर सवार पातळ)

मुंगे आवडा मोगरा (मुंगेएवढा (मुंगेच्या दाण्याएवढा) मोगरा)

तल्ली आवडी कवाड (तिळाएवढी कवाड (दार))

राम छ क रूप छ  (राम आहे कि रूप आहे)

कूण छ कुवारो (कोण आहे कुंवारा)

बेटा लार बोडी आवं (मुलामागे सून येते)

गोसाई बाबा साई हेव (गोसाई बाबा कृपा कर)

वदई मधील क्षणचित्रे (मोठ्या भावाच्या लग्नप्रसंगी मला दिलेला चटका)

साधारण भटक्या जमातीय जीवनाविषयी काहीतरी संगाणारे आणि रूपकांचा वापर करून आपल्या आसपासच्या गोष्टींचा अर्थ लावून केली गेलेली ही प्रार्थना आहे. चटका देऊन झाल्यावर मुलाला घराबाहेर काढलं जातं, (मग तिसऱ्या दिवशी जेव्हा मुलगा लग्न करून मुलीला घेऊन घरी परत येतो तेव्हाच त्याला घरात परत घेतलं जातं) घराबाहेर काढल्यावर लागलीच जो विधी असतो त्यात बायका जमून ‘टेळो’ म्हणतात, टेळो म्हणजे स्त्रियांनी विशिष्ट लयीत गायलेली सामुहिक गाणी. या प्रसंगी जी गाणी असतात त्यांचा आशय साधारणत: मुलाला भावनिक साद घालणारा असतो. त्याला ‘वदाव’ म्हणतात यात आई आणि लेकराचा करुण संवाद आहे. हा संवाद म्हणजे मुलगा आता गृहस्तीत प्रवेश करणार असल्याने त्याची आई आणि पैतृक कुटुंबाने व्यक्त केलेल्या चिंतेचं (anxieties) चे प्रत्यंतर त्यात आहे.

वेगो तो आरे मारा लाडला (परत ये रे माझ्या लाडक्या)

तारी मावड जोव छ वाट (तुझी आई बघते वाट)

आब कसो आऊ मारी मावड (आता कसं येऊ आई)

सासू साळी सी लागी परीत  (सासू-मेहुणी सोबत लागली प्रीत)

पपीया बोल (बोले पापिहा मोर)

 

धड रे मुंड मावड बेट जो (इकडे दाराकडे ये आई)

माळवी र मुंडो ए मावड खोल द (तुझ्याकडची पिशवी खोल)

सेला ए मोळ्या वालान काड द (माझ्यासाठी शेला आणि बाशिंग काढून ठेव)

चंची न सरोता वाला न काड द (चंची आणि सरोता (सुपारीचा अडकिता) काढ)

वाला तो चालो हिरे (रांझा) रे देस (तुझा लाडका निघतोय हिर (रांझा ची हिर) च्या देशा)

वाला तो चालो पंजाबी देस (तुझा लाडका निघाला पंजाबी देश)

पुढील अनेक गाण्यांचा आशय काहीसा नाळ तुटण्यासारखी आहे. मुलाची नाळ हि दोन वेळा तुटते, एकदा जैविक अर्थाने जन्म होतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा लग्न होतं तेव्हा, त्यामुळे या भावनिक संवादाची तीव्रता फार जास्त आहे. या नंतर मुलाच्या गळ्यात पडून आई, आत्या, बहिण, काकू रडतात. आता तो मुलगा परका होईल, आज आपल्या घरातील हि व्यक्ती असती तर तिला किती आनंद झाला असता अशा आशयाचे ‘ढावलो’ (दुःखगीते) रडतांना गायले जातात. हि गाणी ऐकून क्वचितच असा एखादा मुलगा असतो ज्याला रडायला येत नाही. या निमित्ताने स्त्रिया आपल्या रोजच्या जगण्यातील दु:खाला वाट मोकळी करत असतात. याशिवाय मुलांच्याही दुःखाचे विरेचन होत असते. 

                                                                                  मित्राच्या लग्नप्रसंगी झालेल्या वदई प्रसंगी गायलेली दुःखगीते

 काही अन्वयार्थ :

वराला स्त्रियांना मिठी मारायला लावणे, दुःखगीते म्हणणे, सामूहिक रडणे, दडपलेल्या आठवणी आणि वेदना सार्वजनिकपणे व्यक्त करणे इत्यादी. वरवर पाहता हे केवळ भावनिक दृश्य आहेत असं वाटू शकतं. पण समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय नजरेतून पाहिले तर हा केवळ भावनांचा उद्रेक नाही तर तो एका सामाजिक संक्रमणाचा आणि दडपलेल्या भावभावना आणि स्मृती दृश्यमान होण्याचा क्षण असतो. व्हिक्टर टर्नर या अभ्यासकाने ने Liminality (उंबरठ्याची किंवा संक्रमणाची अवस्था) ही संकल्पना मांडली आहे. काही सामाजिक  विधी माणसाला जुन्या आणि नव्या सामाजिक ओळखीच्या मधल्या अवस्थेत आणून उभे करतात. या अवस्थेत माणूस ना पूर्णपणे जुना राहतो, ना पूर्णपणे नवा बनतो तर तो एका सीमारेषेवर उभा असतो. लग्नातील वरही अशाच अवस्थेत असतो. या संक्रमण अवस्थेत तो केवळ मुलगा राहिलेला नसतो परंतु पूर्णपणे पतीही झालेला नसतो. तो एका सामाजिक उंबरठ्यावर उभा असतो. या क्षणी त्याच्यावर नेहमीच्या सामाजिक अपेक्षा तात्पुरत्या सैल होतात.

परंतु हा विधी केवळ वराच्या संक्रमणाचा आहे असंच मानायला पाहिजे का ? कारण या विधीत स्त्रियांचे सामूहिक रडणे, गाणी म्हणणे आणि दडलेल्या भावनांना सार्वजनिक रूप देणे याचाही अंतर्भाव होतो. पितृसत्ताक समाजात स्त्रियांचा दुःखानुभव हा व्यक्तिगत असतो. संसाराचे रहाटगाडे, माहेरपासूनचे तुटणे, रोजमार्राचे दुय्यमत्व, आयुष्यभरातील दडपलेले दु:खानुभव या सर्व गोष्टी कुटुंबसंस्थेच्या तटबंदीत दफन केलेल्या असतात. एका ढावलो मध्ये म्हणतात तसं  

पाड बळं विरणा सारीन दिकं, आत्मा बळं केन दिकं, पाडेरो धुवा विरणा सर्गे पुचं, मनेरो धुवा मनमं रेवं

डोंगर जळतं ते सर्वांना दिसतं, माझा आत्मा जळतो ते कोणाला दिसेल, डोंगराचा धूर स्वर्गात पोचतो, माझ्या मनातील धूर मनातच धुमसतो

 

या दडपलेल्या भावना अचानक या विधीत सामूहिक होतात. टर्नर याला Anti-Structure (सामान्य सामाजिक संरचनेचे तात्पुरते स्थगन) म्हणतो. या विशिष्ट काळात काही नियम तात्पुरते बाजूला ठेवले जातात. पुरुषाला रडण्याची परवानगी मिळते. स्त्रियांना व्यक्त होण्याची मुभा असते. दुःख दडपवण्याची सक्ती थोडा वेळ का होईना थांबते. टर्नर आपल्याला हि संक्रमणावस्था समजण्यास मदत करतो, परंतु या भावनांना आवाज विशिष्ट क्षणीच का मिळतो हे समजून घेण्यास आपल्याला बोर्दुयू ची Habitus ही संकल्पना उपयुक्त ठरेल. Bourdieu च्या Habitus (सामाजिक सवयींची शरीरात बसलेली रचना) या संकल्पनेतून पाहिले तर समाज केवळ नियमांचा समुच्चय नसतो तर ते नियम आपल्या शरीरमानाचा ताबा घेतात. कसे बसायचे, कसे चालायचे, कधी बोलायचे, कधी गप्प राहायचे, पुरुषांनी कधी रडायचे नाही, स्त्रियांनी किती दुःख व्यक्त करायचे या सर्व बाबींचा अंगीकार आपण करत असतो. पितृसत्तेने निर्माण केलेल्या या habitus मध्ये तात्पुरती फट म्हणून आपण या विधीकडे पाहू शकतो.

तात्पुरता का होईना सामाजिक नियम मोडले जात असतील, तर हा विधी संपल्यानंतर काय होते? इथे Catherine Bell यांनी मांडलेली Ritualization (विधीद्वारे सामाजिक अर्थनिर्मिती) या संकल्पनेतून याचे काही स्पष्टीकरण आपल्याला मिळते. Bell च्या मते विधी हा केवळ परंपरेचा पुनरुच्चार नसतो; तो समाज स्वतःला समजावण्याचा मार्ग असतो. काही कृतींना विशेष अर्थ देऊन समाज स्वतःची पुनर्रचना करत असतो. मग कदाचित हा विधी एका वेगळ्याच पद्धतीने काम करत असेल असा अंदाज बांधता येऊ शकतो. इथे स्त्रियांना दुःख व्यक्त करण्याची जागा मिळते, पण त्याचवेळी त्या दुःखाला एका ठराविक क्षणात त्या त्या विधीपुरता बंदिस्त आणि मर्यादितही केलं जातं. इथे पुरुषाला रडू दिलं जातं परंतु लगेचच त्याच्याकडून कठोरपणाची अपेक्षा केली जाते. म्हणजेच या विधीत विधी तात्पुरते नियम शिथिल केले जातात पण त्यानंतर त्याच सामाजिक राहाटगाड्यात जावं लागतं.

Thursday, May 7, 2026

फ्लॅन्यूअर

आज ब्लॉगचं नाव बदलून फक्त “नोंदवही” असं केलं. आधीचा “दस्तावेजकार” असा अचानक गायब का झाला? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. परीघाबाहेरील कथनं, स्मृती आणि इतिहास प्रकाशात आणण्यासाठी केवळ लिखित दस्तावेजच पुरेसे असतात का ? असा प्रश्न पडल्यावर, गेल्या पाच वर्षातील दस्तावेजांसाठीच्या भटकंतीअंती तरी या प्रश्नाचं उत्तर ‘पुरेसं नाही’ असं मिळालं. 

त्यामुळे Archive (संग्रह/अभिलेखागार/पुराभिलेखागार) नावाची आधुनिक संस्था कशी उदयाला आली याचा क्लिष्ट परंतु आवश्यक धांडोळा घ्यावा लागेल.

पुराभिलेखागार, धुरिणत्व आणि सत्ता संबंधाची चिकित्सा: 

पुराभिलेखागार सकृतदर्शनी निरपेक्ष असा अवकाश वाटत असला तरी पुराभिलेखागार आणि दस्तावेजीकरणाची प्रक्रिया ही सत्तासंरचनेत जखडलेली आणि त्या हितसंबंधांनी बाधित अशी space असते असे विविध अभ्यासक दाखवून देतात. ऐतिहासिक साधनांचा संग्रह हा केवळ निरपेक्ष प्रांत नसून, सत्ता, अधिकार आणि वर्चस्व (hegemony) निर्माण करण्यासाठी पूरक अशी संस्थात्मक रचना निर्माण करणारी कृतीही ठरते. पुराभिलेख संग्रहांच्या इतिहास व कार्यांचा सैद्धांतिक अभ्यास करणारे जॅक देरीदा, अ‍ॅन लॉरा स्टोलर, मिशेल-रॉल्फ त्रुइयो, टेरी कुक, अ‍ॅचिल म्बेंबे, व्हर्न हॅरिस सारखे विचारवंत अभिलेख संग्रहांना ज्ञाननिर्मिती, सामुहिक स्मृतींचे नियंत्रण आणि राजकीय वैधतेच्या प्रस्थापनेची केंद्रस्थाने म्हणून पाहतात. 

जॅक देरीदा संग्रहाच्या संकल्पनेला arkhē या ग्रीक संज्ञेशी जोडतो, या शब्दाचा अर्थ अर्थ एकाच वेळी ‘प्रारंभ’ (commencement) आणि ‘आदेश’ (command) असा होतो. देरीदाच्या मते अभिलेख संग्रह हे स्मृतीचे निष्क्रिय भांडार नसून, कायदा, अधिकार आणि विशिष्ट प्रकारच्या ऐतिहासिकतेला अधिकृत दर्जा प्रदान करणारी संस्थात्मक यंत्रणा असते. ज्या वर्गांचे संग्रहावर नियंत्रण आहे, ज्यांना तिथे मुक्त प्रवेश शक्य असतो व जे समूह त्यांचा अर्थ लावतात तेच पर्यायाने विशिष्ट प्रकारच्या ‘ऐतिहासिकतेचे’ नियंत्रण करतात. 

अ‍ॅन लॉरा स्टोलर यांनी वसाहतीकरणाच्या संदर्भात पुराभिलेख संग्रहांची चिकित्सा केलेली आहे. त्यांच्या मते वासाहतिक पुराभिलेख हे वासाहतिक सत्ता आणि तर्क बळकट करण्याचे साधन असल्या कारणाने त्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पुराभिलेख संग्रहांना ‘विरुद्ध दिशेने’ (reading against the grain) वाचण्याऐवजी ‘त्याच प्रवाहात’ (reading along the grain) वाचायला हवे. वासाहतिक प्रशासकीय दस्तावेजांमधील अध्याहृत वंशवाद आणि त्याचा ज्ञानशास्त्रीय पाठपुरावा त्यांनी आपल्या अभ्यासातून पुढे आणला आहे. अशा प्रकारे पुराभिलेख संग्रह हे वसाहती सत्तेचे तंत्र (technologies of governance) म्हणून कार्य करतात व त्यासह सत्तेचे पुनरुत्पादन करून ‘वसाहतीक मानस’ (colonial common sense) घडवतात असं त्या स्पष्ट करतात. 

मिशेल-रॉल्फ त्रुइयो त्यांच्या बहुचर्चित silencing the past या ग्रंथात इतिहासलेखनाच्या प्रक्रियेत सत्तेची भूमिका चार टप्प्यांवर स्पष्ट करतात. एक घटना घडणे, दुसरे त्यांची नोंद होणे, तिसरे ती संग्रहित होणे आणि चौथे तिचे कथनात रूपांतर होणे. या प्रक्रियेत संग्रहांना मध्यवर्ती महत्व प्राप्त होतं. त्यांच्या मते संग्रह काही कथानके काही आवज यांना वगळतात तर काहींना विशेष स्थान देतात. त्यामुळे संग्रह हे इतिहासकथनात ‘मौन’ (silences) निर्माण करतात. काही कथानकांची ही वगळणूक सत्ता संरचनेच्या गरजेपोटी निर्माण होते. त्या-त्या समाजातील प्रभुत्वशाली वर्ग याद्वारे इतिहासलेखन आणि सामुहिक स्मृती यावरील आपले वर्चस्व आणि ताबेदारी कायम ठेवतो. 

टेरी कुक यांनी संग्रहव्यवस्थापानाच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. त्यांनी त्यातील ‘तटस्थता’ आणि ‘व्यावसायिक वस्तुनिष्ठता’ या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याच्या मते दस्तऐवजांचे मूल्यांकन (appraisal) ही एक राजकीय प्रक्रिया आहे, कारण त्यातूनच कोणती स्मृती टिकेल आणि कोणती नष्ट होईल याची दक्षता घेतली जाते. म्हणून संग्रहव्यवस्थापनातून संस्थात्मक सत्तेचे पुनरुत्पादही होत असते असे त्यांचे मत आहे. 

अ‍ॅचिल म्बेंबे संग्रहांकडे राज्यसत्तेची संस्था म्हणून पाहतात. त्याच्या मते संग्रहांच्या निवड आणि वगळणीतून त्या सत्तेचे प्रत्यंतर घडते. संग्रह हे political subjects घडवत असतात. कोणते दस्तऐवज ‘संग्रहणीय’ ठरतात आणि कोणते ‘असंग्रहणीय’ राहतात, राजकीय अधिसत्ता बळकट होण्याची प्रक्रियाही संभवते. मौखिक परंपरा, हिंसेचे अनुभव, विस्थापनसारखी कथानके म्हणूनच परिघाबाहेर राहतात अशी मांडणी ते करतात. 

व्हर्न हॅरिस यांनी दक्षिण आफ्रिकेतील अपरथाइड राजवटीच्या संदर्भात संग्रहांचा अभ्यास केलेला आहे. अपरथाइड राजवटीतील प्रशासकीय अभिलेखागार वंशवादी राजवट अधिक व्यवस्थितपणे चालवण्यासाठी निर्माण केले गेले. इथे संग्रहांची निर्मिती आणि वापर बहुसंख्य काळ्या लोकांवर नियंत्रण आणि पाळत ठेवण्याचे साधन म्हणून केला गेला. यातून संग्रह कधीही तटस्थ नसतात तर ते नेहमीच राजकीय संघर्षांनी व्याप्त असतात असे हॅरिस अधोरेखित करतात. 


वरील विवेचनावरून असं कोणी मानू नये कि आपण दस्तावेजांना ‘सिरे से खारीज’ करत आहोत, तर त्याचा अर्थ इतकाच आहे कि दस्तावेज आणि विशेषतः संस्थात्मक दस्तावेजांची आणि संग्रहांची (सत्तासंबंधांमुळे) एक अंगभूत मर्यादा असते, त्या मर्यादांच्या पलीकडे बघण्यासाठी आपल्याला “फ्ल्यान्यूर” मदत करतो.

वॉल्टर बेंजामिनचा फ्लॅन्यूअर (Flâneur) :

फ्लॅन्यूअर (Flâneur) या फ्रेंच शब्दाचा अर्थ "शहरात उद्देशहीन भटकणारा मनुष्य" असा होतो. बेंजामिनने या ‘उद्देशहीन’ संकल्पनेला सखोल तात्त्विक आणि ऐतिहासिक अर्थ दिला. बेंजामिन चा फ्लॅन्यूअर हा फक्त “भटकणारा” नसून आधुनिक भांडवलशाही समाजाचा एक विशिष्ट प्रकारचा निरीक्षक (observer) आहे. फ्लॅन्यूअर त्रयस्तपणे शहराचा अनुभव घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचे झाल्यास “The flâneur is the observer of the marketplace.” मार्केट म्हणजे फक्त बाजारपेठ असा मर्यादित अर्थ त्याला अभिप्रेत नाही, तर आधुनिक समाजात समग्र मानवी जीवनाला व्यापलेल्या ‘वस्तूकरणा’चं तो निरीक्षण करतो. कला-साहित्यापासून ते मानवी संबंधाचेदेखील ज्या भांडवली समाजात वस्तूकरण झालं आहे, फ्लॅन्यूअर हा त्या वस्तुमय जागचा (commodity world) निरीक्षक आहे. 
“Phantasmagoria” हा बेंजामिन च्या विचारातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ, स्वप्नवत दृश्य (illusion, spectacle). भांडवलशाहीच्या झगमगाटात एका प्रकारचे सामुहिक स्वप्नरंजन (collective dream) असते. फ्लॅन्यूअर त्या स्वप्नात फिरतो परंतु त्याच्या “आभासाला” देखील ओळखून असतो. आधुनिकतेच्या आभास (illusion) आणि वास्तवाच्या (reality) मध्येही तो commodities मागील सामाजिक संबंध समजून घेत असतो.

आता या सर्वांचे काय ? 

आपल्या जगप्रसिद्ध Theses on the Philosophy of History या निबंधात बेंजामिन जेत्यांच्या कथनातून नाही तर भूतकाळातील हिंसा आणि अवशेष यांच्या आधारे इतिहासाकडे बघण्याचा आग्रह धरतो. तो इतिहासाला स्मारकांमध्ये नाही, तर अवशेषांमध्ये शोधतो; अधिकृत संग्रहांमध्ये नाही, तर शहराच्या विस्मृतीत गेलेल्या कोपऱ्यांमध्ये शोधतो. त्याच्यासाठी इतिहास हा मृत भूतकाळ नसून वर्तमानात सतत चमकून दिसणारा अनुभव आहे. फ्लॅन्यूअर साठी इतिहास हा “पूर्ण झालेला भूतकाळ” नसतो तर तो वर्तमानाच्या पृष्ठभागांमध्ये जिवंत असतो. फ्लॅन्यूअर इतिहासाला संग्रहालयातील बंदिस्त दस्तावेज म्हणून पाहत नाही. तो म्हणतो 

“History decays into images, not into stories.”

(The Arcades Project, p. 476.) 

त्याच्या मते इतिहास हा एकसंध कथन नसून तो तुकड्यांमध्ये आणि प्रतिमांमध्ये विखुरलेला असतो. फ्लॅन्यूअर या विखुरलेल्या खुणांना जोडतो. त्यामुळे तो इतिहासाची “पुनर्रचना” करत नाही तर इतिहासाच्या अवशेषांचे अर्थनिर्णयन करतो. फ्लॅन्यूअर वर्तमानात दडलेल्या इतिहासाला शोधतो, त्यासाठी त्याने dialectical image नावाची संकल्पना वापरली आहे. 
“Image is that wherein what has been comes together in a flash with the now to form a constellation.”

(The Arcades Project, p. 462.)

याचा अर्थ असा की भूतकाळ आणि वर्तमान हे वेगळे नसतात. वर्तमानातील एखाद्या दृश्यामध्ये भूतकाळ अचानक चमकून दिसतो. हा क्षण म्हणजे इतिहासाच्या जाणीवेचा क्षण असतो. Flâneur अशा क्षणांचा शोध घेतो. तो वर्तमानाला केवळ समकालीन म्हणून पाहत नाही तर त्यामध्ये गाडलेला इतिहास शोधतो. तो इतिहासाला विस्मृतीत गेलेल्या अनुभवांच्या आधारे समजून घेतो. 

बेंजामिन च्या दृष्टीने इतिहासाचे आकलन म्हणजे “भूतकाळ जसा होता तसा” मांडणे नव्हे. तर,

“To articulate the past historically does not mean to recognize it ‘the way it really was’… It means to seize hold of a memory as it flashes up at a moment of danger.”

(Theses on the Philosophy of History, Thesis VI.)

म्हणूनच फ्लॅन्यूअर इतिहासाला निश्चित सत्य म्हणून पाहत नाही तर त्याला स्मृती म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतो. 

प्रचलित दस्तावेजांमध्ये अशाप्रकारे दडपले गेलेले कथन, स्मृती आणि इतिहास काही ठिकाणी सापडू शकतात, परंतु त्याच सोबत अवशिष्ट स्वरूपात किंवा नेणीवेत दडपलेल्या स्मृती, कथनं आणि इतिहास शोधण्यासाठी आपल्याला फ्लॅन्यूअर सारखी मुशाफिरी करावी लागेल. असे अनियमित लेखन “नोंदवही” मध्ये नोंदवून ठेवणार आहोत.

Wednesday, April 8, 2026

एका मंडलयात्रीचे निर्वाण …

‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’ चे संस्थापक शब्बीर अन्सारी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख

१९४८ साली हैद्राबाद संस्थानात ‘पोलीस ऍक्शन’ दरम्यान या संस्थानाच्या क्षेत्रात येणाऱ्या जालन्यातील अन्सारी कुटुंबाने पलायनाचा निर्णय घेतला. रात्रीच्या काळयाकुट्ट अंधारात पाच सहा जण हातात कंदील घेऊन अन्सारी कुटुंबाचा शोध घेत होते. हे शोधाशोध करणारे साळी गल्लीतील हिंदू विणकर होते. अन्सारी कुटुंबातील हबीबा बी गरोदर होत्या आणि अशा स्थितीत त्यांनी वणवण भटकणे योग्य नाही, असं सांगत हिंदू विणकरांनी अन्सारी कुटुंबियांची समजूत काढली. इतकंच नव्हे तर, ‘आमचा जीव गेला तरी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू’, याची खात्रीही दिली. पुढे ऑक्टोबर १९४८ मध्ये  हबीबा बी यांच्या पोटी शब्बीर अहमद अन्सारी यांचा जन्म झाला. रात्रीच्या अंधारातील समता आणि बंधुत्वाचा तो कंदील पुढे ओबीसी चळवळीसाठी आपले आयुष्य वेचून शब्बीर अन्सारी यांनी तेवत ठेवला. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या विचारकार्याला आदरांजली म्हणून हा लेखप्रपंच.

२०२४ साली प्रकशित झालेले राजकीय आत्मवृत्त

धडपड्या कार्यकर्ता

सकाळी डबलरोटी कारखान्यात काम, दुपारी शाळा, सायंकाळी सुताच्या कांड्या तयार करणे, कपड्यांची तुरपई आणि काचबटण करणे अशा परिस्थितीही त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मुंबई जायचे ठरवले परंतु शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परत जालन्याला येऊन त्यांनी मास्टर टेलर्स म्हणून नावलौकिक मिळवले. पुढे त्यांची धडपड वाढत गेली मुंबईतील एका होजिअरी फॅक्टरी मध्ये नोकरी करत असताना त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. याच दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समूहांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या मंडल आयोगाने आपला अहवाल १९८० साली केंद्र सरकारकडे सादर केला. या अहवालामध्ये जुलाह, नदाफ, पिंजारी आणि भिश्ती या मुस्लिम जातींचाही समावेश होता. मुस्लिम धर्मात जाती नाहीत असा अनेकांचा पूर्वापार समज होता. मग या जाती आल्या कुठून? मंडल आयोगाच्या अहवालातील नोंदीने अन्सारींना अक्षरशः झपाटून टाकले. त्यांनी ओबीसी चळवळीत आधीच सक्रीय असलेलेल जनार्दन पाटील, समाजवादी विचारांचे पत्रकार कपिल पाटील, आंबेडकरी विचारवंत  प्रा. अरुण कांबळे सारख्या अनेकांसोबत संपर्क साधला आणि इतर मागास वर्गाचा मुद्दा मुळातून समजून घेतला. लोकव्यवहारात मुस्लिमांमध्ये जाती आहेत असा जिवंत अनुभव स्वतः अन्सारी यांचा होता. त्यामुळे मुस्लिमांमधील या भेदभावग्रस्त जातींपर्यंत इतर मागास वर्गांसाठी लागू करण्यात आलेल्या तरतुदी पोहोचाव्यात याचा ध्यास अन्सारींनी घेतला. यातूनच १९८१ साली त्यांनी महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन केली. समाजवादी नेतेमंडळी आणि विचारवंत वगळता या संघटनेविषयी मुस्लिम जनतेत फारसा उत्साह नव्हता. १९९० साली मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर काहीसा जनाधार उभारण्यात त्यांना यश आले. एका धडपड्या कार्यकर्त्यांचा हा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला होता, ते आव्हान होते मुस्लिम समाजातील पुराणमतवाद्यांचे, परंतु मुस्लिम तरुण तरुणींच्या भौतिक प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवत अन्सारींनी पुढेही ही धडपड सुरु ठेवली, या प्रक्रियेत त्यांनी व्यापक ओबीसी चळवळ आणि फुले-आंबेडकरी चळवळीशी स्वतः ला जैविकरीत्या जोडून घेतले.

ओबीसी चळवळीत प्रवेश

मंडल आयोगाचा अहवाल १९८० साली सादर करण्यात आला असला तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होत नव्हती. तेव्हा राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाची स्थापना झाली. चौधरी ब्रह्मप्रकाश, कर्पुरी ठाकूर, कांशीराम यांच्यासारख्या नेत्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अधिवेशन भरवले, त्यात महाराष्ट्रातील प्रतिनिधींमध्ये अन्सारींचाही समावेश होता. महाराष्ट्रातील मंडल आयोग कृती समितीने पुण्यात १९८३ साली एक राज्यव्यापी परिषद भरवली त्यात अन्सारी निमंत्रित होते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेनेही जालना येथे १९८४ साली मंडल आयोग अंमलबजावणीसाठी परिषद भरवली. या परिषदेने मुस्लिम ओबीसींचा प्रश्न राष्ट्रीय पटलावर नेला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी चौधरी ब्रह्मप्रकाश होते. मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नांसह मराठवाडा विद्यापीठ नामांतराची मागणी या परिषदेत करण्यात आली. प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. अरुण कांबळे यांच्यासारखे नामांतरवादी नेते या परिषदेत सहभागी झाले होते. पुढे संघटनेचा विस्तार झाला आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’ म्हणून नावारूपाला आली. भटक्या आणि मागासवर्गीय मुस्लिम जातींना ओबीसी प्रमाणपत्र मिळावे हा एककलमी कार्यक्रम ठरवून अन्सारींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. छप्परबंद, शिकलगार, सायकलगार, मदारी, अस्वलवाले, सापवाले, फकीर, भांड, डोंबारी, गारुडी, धावड, पाथरवट, माकडवाले, टकारी, कल्हईगार, इराणी, चित्ता पारधी, भिश्ती, काकर अशा कितीतरी जातींचा शोध घेऊन त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम त्यांच्या संघटनेने केले. त्यांच्या संघटनेने किती अभिनव पद्धतीने या जातींची ओळख पटवली याची प्रचिती एका उदाहरणातून येते. मुस्लिम पाथरवट आणि धावड यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यात अडचण झाली तेव्हा संघटनेने संशोधन केले, मुंबईतील मदनपुरा येथील एका मशिदीचे नाव दगडफोडु मशीद असल्याचा पुरावा देऊन मुसलमानात दगड फोडणारी जात आहे हे सिद्ध झाले. संघटनेच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने पुढे वेळेवेळी परिपत्रक काढून अशा अनेक भटक्या जाती जमातींना जात प्रमाणपत्र मिळवणे सुकर केले.

अन्सारी मुस्लिमांना जातीच्या नावाने फितवत आहेत अशी कुजबुज पुराणमतवादी मुस्लिम गटांतून केली जात होती. जमात-ए-इस्लामी हिंदचे मुखपत्र ‘दावत’ मधून विशेष अशी टीका अन्सारींच्या संघटनेवर झाली. त्याचा वेळोवेळी जाहीर प्रतिवाद अन्सारी यांनी केला. पुराणमतवाद्यांसोबत एका मशिदीत झालेल्या जाहीर वादिवादाची वृत्तांत त्यांनी आपल्या ‘मंडलनामा’ या राजकीय आत्मवृत्तात दिलेला आहे. संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्या नसीम महात यांनी महिला बचत गट, गृहउद्योग अशा विविध उपक्रमातून मुस्लिम महिलांचे उन्नयन साधले. याशिवाय नर्सिंग महाविद्यालय सुरु केले.

अन्सारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे महानायक दिलीप कुमार यांच्यासारखं प्रसिद्ध व्यक्तिमत्व मुस्लिमांच्या राजकीय उत्थानासाठीच्या चळवळीत सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं. दिलीप कुमार यांनी सामाजिक न्यायाच्या व्यापक राजकारणासाठी अन्सारी यांच्यासोबत भारतभर दौरे केले, ठिकठिकाणी मेळावे भरवले. धार्मिक सलोखा, सामाजिक न्यायाचा सहभाव आणि प्रबोधन अशा त्रिसूत्रीवर दिलीप कुमार, जॉनी वॉकर, हसन कमाल यांच्यासारखे सिनेसृष्टीतील लोकं चळवळीशी जोडले गेले.

संघटनेने केलेल्या सामाजिक मशागतीला राजकीय फळही मिळाले. १९९९ साली संघटनेचे सभासद असलेले दोन आमदार निवडून आले. परंतु निवडणुकीच्या राजकारणाच्या काही अंगभूत मर्यादा आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी संस्थात्मक काम आणि सामाजिक प्रबोधन सुरु ठेवले. जातनिहाय जनगणना व्हावी अशी त्यांच्या संघटनेची ठाम भूमिका होती. परंतु जातनिहाय जनगणना झाल्यावर पुढे राजकीय कृतिकार्यक्रम काय असावा याची स्पष्टता एकंदरच ओबीसी राजकारणासारखी त्यांच्या संघटनेकडेही नव्हती. मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही असलेल्या संघटनेला त्यापुढील कार्यक्रमपत्रिकेच्या स्पष्टतेअभावी काही मर्यादा आल्या.

सारेच दीप कसे मंदावले आता...

२००६ साली सच्चर कमिटीने दिलेल्या अहवालात मुस्लिमांच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे विवरण दिलेले आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या तुलनेत मुस्लिमांची स्थिती अधिक भीषण असल्याचा निर्वाळा सच्चर कमिटीने दिला आहे. सामाजिक न्यायाचे राजकारण आणि जगण्या-मरण्याचे भौतिक प्रश्न यांना घेऊन इथल्या बहुसंख्य श्रमिक आणि कष्टकरी जाती-वर्गांशी मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न अन्सारी सतत करत राहिले. महाराष्ट्रात आज ओबीसी राजकारण कुंठीत अवस्थेत सापडले आहे. ओबीसी राजकारण प्रतिनिधित्वाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टीच गमावून बसले आहे अशी स्थिती सध्या आहे. अलीकडे शेतकरी जाती आणि ओबीसी यांच्यातील धनदांडग्यांच्या राजकीय रस्साकशीत शेतकरी जाती आणि ओबीसी यांच्यातील बहुसंख्य वंचित घटक भरडला जातोय. अशात ओबीसींसाठी आर्थिक संसाधनांची मागणी करणारे, छोट्या मोठ्या पातळीवर राजकीय लढे उभारणारे आणि सांस्कृतिक सहभावासाठी प्रबोधन करणाऱ्या अन्सारी यांच्यासाखे मंडलयात्रीचे निर्वाण मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

Thursday, March 12, 2026

‘देख वीरू... ये कहानी भी अधुरी रह गई!’

‘कितने आदमी थे?’, ‘बहुत याराना लगता है’, ‘ये हात मुझे देदे’, असे ‘शोले’ चित्रटातले अनेक संवाद आपल्या समाजमनामध्ये रुजून गेले आहेत, आणि आजही समाजमाध्यमांमधून या संवादांवर आधारित मीम्सचा पूर येत असतो. ‘शोले’ प्रदर्शित होऊन पन्नास वर्षं उलटून गेली तरी, हा अजरामर सिनेमा आपल्या लोकप्रिय संस्कृतीच्या पटलावर तरळत राहतो. शोले फक्त मसालापट होता, हे यामागचं कारण नक्कीच नाही. उलट, ‘शोले’तील व्यक्त आणि अव्यक्त, पूर्ण आणि अपूर्ण राजकीय व सामाजिक संदर्भामुळे त्याचा समाजमनावरचा ठसा इतका दीर्घकालीन ठरला आहे. ‘शोले’बद्दलच्या जवळपास लोककथा बनलेल्या घटना आणि वर्णनांपेक्षा त्याच्या पटकथेतील गर्भित राजकीय आणि सामाजिक संदर्भांचा परामर्श घेणं अधिक उद्बोधक ठरेल. 

 

पन्नास वर्षांनंतरही सिनेमागृहात चालणारा शोले 
(छायाचित्र - लेखक)

कुठलीही कलाकृती किंवा कथन हे राजकीय आणि सामाजिक संघर्षापासून अलिप्त नसतात. तत्ववेते फ्रेडरिक जेमसन याला ‘राजकीय नेणीव’ (political unconscious) अशी संकल्पना वापरतात. लेखकाला जाणीवपूर्वक जे म्हणायचं असतं त्याच्यापलीकडेही अजाणतेपणे गर्भित असे सामाजिक आणि राजकीय तणाव कथानकात असतात. सरधोपट, वरवर रंजनप्रधान भासणाऱ्या ‘शोले’मध्ये धीरगंभीर राजकीय आणि सामाजिक भाष्य दडलेलं आहे. प्रस्तुत लेखात ‘शोले’चं कथन, प्रतिकथन, आणि त्यातील काही अशक्यता, अशा तीन भागांमध्ये त्यातील गर्भित सामाजिक-राजकीय भाष्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.



जाणिवेतील कथन

शोले १९७५ मध्ये प्रदर्शित झाला. हे वर्ष भारतीय इतिहासातील राजकीयदृष्ट्या महत्वाचं वर्ष. प्रधानमंत्री इंदिरा गांधींचा राजकीय सर्वाधिकार वाढत जाऊन देशावर आणीबाणी लादण्यापर्यंत गेला होता. सिनेमाच्या कथानकाची सुरुवातच त्या संदर्भात होते. गब्बर सिंग नावाच्या डाकूच्या अन्यायापासून रामगडची सुटका करण्यासाठी गावातील ठाकूर (माजी पोलिस अधिकारी) दोन चोर बदमाशांचा शोध घेत असतो. कधीकाळी कायदा सुव्यवस्थेचा पाठीराखा असणारा ठाकूर कायदाबाह्य मार्गाने, बदमाशांच्या मदतीने अन्यायनिवारणाची भूमिका घेतो. कायदा सुव्यवस्था किंवा गावातल्या लोकांची सामूहिक प्रतिकार शक्ती उभी करून गब्बरचा सामना करता आला असता, परंतु सत्तरच्या दशकात जनतेची सामूहिक प्रतिकारशक्ती क्षीण झालेली आहे असे त्या काळातील राजकीय वास्तवाचे प्रत्यंतर सिनेमातही बघायला मिळते, एक नेता तारणहार ठरू शकतो. ही समूहाभावना त्या काळात बळावत होती. अर्थातच अवतारवादाची रूढ कल्पना आपला सांस्कृतिक स्थायीभाव आहे. त्यामुळे जय-विरुने ठाकूर या गावगाड्यातील धुरिणाच्या आदेशावरून अन्यायनिवारण करणं हे प्रेक्षकांना अधिक रुचतं. परंतु, जय आणि वीरू हे कोण असतात, कुठून येतात, त्याचं गाव, सामाजिक स्थान काय याविषयी कुठेही सिनेमामध्ये काहीही सांगितलेलं नाही. मात्र ठाकूर, खुराना साहब (पोलिस अधिकारी) यांसारख्या लोकांचं सामाजिक स्थान लक्षात येण्यासारखं आहे. रामगड या अनोख्या गावात धातुकाम करणारे, विणकाम करणारे, शेतकरी अशा श्रमिक लोकांचं चित्रण येतं, परंतु त्यावरही फारसा भर दिला जात नाही. इमाम साहेबांच्या एकमेव मुस्लिम कुटुंबाची स्वायत्तता आणि गावातील त्यांचं आदराचं स्थान हे लक्षात येण्यासारखं असतं. रामगडचा गावगाडा ‘गुण्यागोविंदाने’ नांदत असतो. त्यात वरकरणी तरी कुठलेही अंतर्विरोध, ताणतणाव, किंवा संघर्ष नसतात. जातिव्यवस्था, सामाजिक भेदभाव, आर्थिक स्तरीकरण फारसे दिसत नाहीत.

 

प्रेक्षकांसाठी पडद्यावरची पात्रं व कथानक ही एकप्रकारची स्वप्नवत प्रतिसृष्टी असते. हिंदी सिनेमानेही ही प्रतिसृष्टी उभारण्यात कुठलीही कसर सोडली नाही. मात्र ते करताना वास्तवदर्शनासोबतच प्रेक्षकांना हवंहवंसं सामूहिक स्वप्नरंजन (collective fantasy) चितारलं गेलं. म्हणून हिंदी सिनेमात ‘नकोसे असलेले’ सामाजिक संघर्ष एकतर सरधोपटपणे किंवा सुप्तपणे दिसतात. अमिताभ बच्चन जेव्हा रुबाब आणि आत्मसन्मानाने, “मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता” असं बजावतो तेव्हा बहुसंख्य श्रमिक स्वतःला त्या नायकामध्ये बघतात; आपल्या असंतोष आणि हतबलतेचा निचरा पडद्यावरील प्रतिसृष्टीच्या माध्यमातून करतात. तोच अँग्री यंग मॅन शोषण करणाऱ्या कारखानामालकापासून मजुरांची सुटका करतो. ‘शोले’मधील जय-विरु हेसुद्धा अशाच प्रकारचे ‘अनाम’ नायक- कदाचित सामान्य निम्न जातीतून आलेले असावेत, आपल्या ‘बदमाशी’च्या साहसी कौशल्यावर ते रामगडचे ‘मसिहा’ बनतात. इथेच ते सर्वसामान्य खेडूत आणि शहरी श्रमिक जाती-वर्गातल्या लोकांच्या नायक असण्याच्या सामूहिक प्रेरणेला पडद्यावर का होईना मूर्त रूप देतात. नेमकं याच काल्पनिक समाधानासाठी इथला कामगारवर्ग अशा सिनेमांचा सर्वात मोठा ग्राहक वर्ग ठरतो. पटकथालेखकांनी बऱ्याच गोष्टींवर मौन बाळगलं असलं तरी ‘शोले’चं एक प्रतिकथनही आहे. 

 

लोकप्रिय संस्कृतीच्या पटलावरील 'शोले' 
(छायाचित्र - लेखक)

नेणिवेतील प्रतिकथन

प्रेक्षकांना  जय-वीरूची सामाजिक ओळख सिनेमामध्ये माहीत नसली तरीही सिनेमामध्ये ‘कोण आहेत जय-वीरू?’ हा प्रश्न वारंवार विचारला जातो मात्र त्याविषयीची अस्पष्टता शेवटपर्यंत कायम असते. ठाकूरसोबत बोलताना जेलर त्यांच्यासाठी ‘ऐसे लोग’ असे शब्द वापरतो.  पुढे जय आणि ‘मौसी’मधल्या विनोदी संवादात त्यांच्या ‘खानदानाचा’ प्रश्न पुन्हा पटलावर येतो. मौसीच्या प्रश्नाची सुरुवातच ‘लडके का खानदान क्या है’ या प्रश्नावरून होते, जय त्या प्रश्नांची विनोदी परंतु खरेखुरे उत्तरं देतो, शेवटी पुन्हा मौसी विचारते ‘तुम्हारे यह गुणवान दोस्त किस खानदान से है?’. जय म्हणतो, “बस मौसी, पता चलते ही हम आपको खबर कर देंगे”. ठाकूर जय आणि राधाच्या लग्नाचा प्रस्ताव राधाच्या वडिलांकडे घेऊन जातो तेव्हा जय आणि विरुच्या सामाजिक स्थानाबद्दल जाणीवपूर्वक बाळगलेलं मौन पुन्हा एकदा अधोरेखित होतं. ‘बिरादरीवाले क्या कहेंगे ठाकुर?’ असा प्रश्न राधाचे वडील विचारतात. शेवटी जय मृत्युच्या दारात असताना ओक्साबोक्सी रडत असलेला विरु त्याला म्हणतो, "हम लोग अपने गांव चले जाएंगे, सब ठीक हो जाएगा" यावरून एक कळतं की त्याचं गाव असतं.  

 

भांडवली उत्पादनप्रक्रियेमध्ये कामगार वर्ग त्याने निर्माण केलेल्या वस्तूंपासून, श्रमाच्या प्रक्रियेपासून, इतर कामगारांसोबत असलेल्या सामाजिक संबंधांपासून आणि एकूणच ‘माणूस’ असण्याच्या जाणिवेपासूनच तुटतो. अशा प्रक्रियेला साधारणपणे परात्मभाव असं म्हणतात. याशिवाय जातिसमाजात शुद्धीअशुद्धीचे तत्व असल्याने, उतरंडीत काही श्रम अशुद्ध समजले जातात आणि कथित शुद्ध श्रमाला वैश्विक मूल्य प्राप्त होतं. भारतात बहुसंख्य श्रमिकांचे असे परात्मीकरण होत असते. सिनेमात त्यांच्या व्यवसायाचा जरी 'गुंड' आणि 'बदमाश' यापलीकडे उल्लेख नसला तरीही जय-वीरू श्रमिक वर्गाचे प्रतिनिधी असतात हे स्पष्ट्पणे दिसतं. ते दोघे अशा परात्म श्रमिकांचे नायक बनतात, महत्तम शौर्य गाजवून रामगडचं रक्षण करतात. या प्रक्रियेत खऱ्या अर्थाने आपली मानवी ओळख प्राप्त करतात, लोकांच्या आदराला पात्र ठरतात. त्याचं आधारतत्व असतं ‘मैत्री’. बंधुत्वाच्या माध्यमातून ते आपल्या परात्मतेवर मात करतात; मैत्रीच्या आधारावर स्वतःचा आत्मशोध घेतात. म्हणून शेवटी मौसीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असतं, खानदान - ‘दोस्ती’ आणि काम – ‘पराक्रम’! 

 

काही अशक्यता 

राधा ही ठाकूरच्या घरातील सून. वैधव्य आल्यानंतर पूर्ण सिनेमात जयसोबत तारुण्यसुलभ नजरानजर झाल्यावर एकदा-दोनदाच ती बोलते किंवा हसते. राधाच्या ‘नशिबी’ आलेल्या वैधव्यात तिच्या साऱ्या इच्छा-आकांक्षा विलीन झालेल्या असतात. सतत पांढऱ्या साडीत वावरणाऱ्या राधाच्या बेरंगी दुनियेत जय आल्यावर पुन्हा रंग भरण्याच्या शक्यता निर्माण होतात. त्यांच्या नात्याला एक निर्णायक वळण लागताना जे संवाद येतात, त्यात बरंच काही दडलेलं असतं. जय जेव्हा वीरूकडे राधा सोबत संसार थाटण्याची इच्छा प्रदर्शित करतो तेव्हा वीरू त्याला म्हणतो "तेरा दिमाग तो खराब नहीं हो गया, जानता है कौन है वह!" पुढे राधाच्या वडिलांसमोर ठाकूर प्रस्ताव घेऊन जातो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असतो, “लेकिन यह कैसे हो सकता है ठाकूर साहब, समाज और बिरादरी वाले क्या कहेंगे?” एकूणच ‘नैतिक’ द्वंद्वात अडकलेली ही स्थिती आहे. जखमी जयकडे धाव घेणाऱ्या राधाची पावलं पायरीपर्यंत येतात, परंतु पायरी ओलांडू शकत नाही. 

 

ठाकूर आणि जय यांच्यातील संबंध दाता-आश्रित अशा स्वरूपाचे आहेत. अंतिमतः जय एका अर्थी ‘भाडोत्री सैनिक’ असतो. त्यामुळे जय आणि राधा यांचं प्रेम ही प्रेक्षकांसाठी ‘सामाजिक अशक्यता’ असते. त्या दोघांच्या  प्रेमामध्ये रूढ सामाजिक दाता-आश्रित संबंधांना तोडण्याची ताकद असते, परंतु ‘नियती’चा कौल जय आणि राधाच्या प्रेमाच्या अशक्यतेच्या बाजूला पडतो. समाज आणि बिरादरीच्या अशा ‘नियतीवादा’त बंदिस्त असलेलं प्रेम बहुतांश सामान्य प्रेक्षकांच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष अनुभवाचा आहे. जयची चिता जळत असते तेव्हा त्याच्या माऊथ ऑर्गनची ती शोकात्म धून वाजते, ती धून आजही अनेक तरुणांची रिंगटोन आहे. शोले कालातीत असण्याचं एक कारण ‘समाज-बिरादरी’बाह्य प्रेमाच्या अशक्यतेतही आहे. 

 

वो अफसाना… 

शेवटी ठाकूर जेव्हा एकटा गब्बर सिंगविरोधात ‘दोन पाय’ करत असतो, तेव्हा ठाकूरच्या नैतिक आवाहनाला प्रतिसाद देत गावकरी गावगाड्याच्या रक्षणार्थ लाठ्या-काठ्या घेऊन उभे ठाकतात. इथे पुन्हा एक नैतिक द्वंद्व उभं राहतं, तेव्हा ठाकूर आपला व्यक्तिगत सूड विसरून गब्बरला ‘कानूनच्या हवाले’ करतो. आपल्या भविष्यातील जगण्याचं स्वप्न रंगवताना जय वीरूला म्हणतो, ‘बुराई ने बंदूक चलाना सिखाया, अच्छाई हल चलाना सिखा देगी’. या स्वप्नासह तो बसंतीला घेऊन आपल्या गावी परततो. तिकडे जयचा मृतदेह जळत असतानाच्या संध्याकाळी राधा आपली खिडकी बंद करून सूर्याकडे कायमची पाठ फिरवते. ठाकूर आपल्या गावगाड्याचं गब्बर सिंगपासून रक्षण करण्यात यशस्वी ठरतो परंतु गब्बरने क्रूरपणे विचारलेला ‘अभी तक जिंदा हो ठाकूर?’ हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. शेवटी अशा पूर्णत्वाला न गेलेल्या जागा दिसत असल्या तरी पटकथालेखकांनी त्याला एक निर्णायक वळण दिलं आहे. साहिर लुधियानवी म्हणतात तसं “वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक ख़ूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा”. एका अर्थी, सत्तरीच्या युगामानसासोबतच ‘शोले’ प्रेक्षकांना अशा ‘खूबसूरत’ अपूर्ण वळणांचीही आठवण करून देतो.

 

© सागर नाईक sagarnaik4511@gmail.com

Tuesday, March 10, 2026

भटक्यांचे वि-‘मुक्ती’कथन : मोतीराज राठोड यांचे राजकीय आत्मवृत्त

 

भटक्यांचे वि-‘मुक्ती’कथन

प्रसिद्ध तत्वज्ञ कॉर्नेल वेस्ट यांनी मानखंडना वाट्याला आलेल्या काळ्या अमेरिकन लोकांच्या ‘कलंकित’ अनुभवाला व्याख्यांकित करताना ‘अस्तित्वावरील जखम’ (ontological wounding) अशी संकल्पना वापरली आहे. याचा अर्थ एखाद्या समुहातून येणाऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वावरच हिनत्वदर्शक, आणि अमानवीकरण घडविणाऱ्या जखमा केल्या जातात,  जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा इतिहास असलेल्या आपल्या देशात या गोष्टीचा प्रत्यय येतो. वासाहतिक काळात ‘जन्मानेच गुन्हेगार’ आणि स्वातंत्र्योत्तर काळात ‘संशयित गुन्हेगार’ समजल्या जाणाऱ्या भटक्या विमुक्त समूहांना तर हि संकल्पना अधिकच चपखल बसते. मोतीराज राठोड यांच्या कपाळावर अशी प्रत्यक्ष जखम लहानपणी झाली. दारूची भट्टी लावली म्हणून त्यांच्या काकांना पोलीस बेदम मारहाण करीत होते, या मारहाणीत त्यांचा जीव जाऊ नये म्हणून याडीने (आईने) चिमुकल्या मोतीराज ला काकाच्या अंगावर टाकून दिले.  अशात एक फटका मोतीराजला डोक्यावार बसला आणि ‘गुन्हेगारी’च्या त्या जखमेची खूण राठोडांच्या कपाळावर कायम राहिली, त्या व्यक्तिगत आणि सामाजिक जखमेचे उच्चाटन करण्यासाठी मोतीराज राठोड पुढे आपले आयुष्य वेचतात, त्यांची ही जीवनयात्रा त्यांनी ‘मी एक गुन्हेगार’ या  अलीकडेच प्रकाशित झालेल्या राजकीय स्वकथनात शब्दबद्ध केली आहे.

गुन्ह्याची परिभाषा :

 ब्रिटीश काळात कायद्याने गुन्हेगार ठरवलेल्या  बंजारा जमातीत     मोतीराज राठोड यांचा जन्म झाला. ‘चोरून नेले सारे गाव, दप्तरी लामाणाचे नाव’ असे अनुभव बालपणापासून राठोडांना आले होते. कुठेही चोरी झाली की पोलीस लमाण तांड्यावर यायचे आणि संशयित आरोपी म्हणून सर्वांची झडती घेतल्यावर, तपासाच्या दरम्यान निर्दयीपणा आणि क्रूरतेचा मनमानी खेळ करायचे, बायांच्या लेंग्यामध्ये बेंडकोळी, पाल सोडून, तर कधी अश्लील चाळे करून कोणाचेतरी नाव वदवून घेतले जाई. हातभट्टीची दारू लावण्याचा ‘गुन्हा’ केलेल्या राठोडांच्या वडिलांना तुरुंगवास झाला तेव्हा बहिणीचा भूकबळी गेला. एका ‘गुन्हेगार जमाती’त त्यांचा जन्म झाला होता.  या ‘गुन्हेगारीचे’ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर चळवळ केली, मनुष्यत्वावर दावा ठोकला, भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी राजकीय - सामाजिक प्रबोधन केले. व्यवस्थेच्या लेखी हे सर्व गुन्हे ठरतात; या सर्व ‘गुन्ह्यांची’ हकीकत त्यांनी दहा भागांमध्ये या पुस्तकात दिली आहे. गुन्हेगारीचा कलंक दूर करण्याचा, सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हक्कांसाठी जे वैचारिक आणि राजकीय कर्तेपण राठोड आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी दाखवले ते आपल्या रोजनिशीत नियमित नोंदवत असत. या  रोजनिशीतील नोंदी संपादित करून प्रदीप खेतमर यांनी सदर राजकीय कथन साकारले आहे.

 

फुले-आंबेडकरी भूमिदृष्टी:

साठ आणि सत्तरचे दशक जगभरात राजकीय परिवर्तनाचा आणि लोकशाहीविषयक नवनवीन सिद्धांतन आणि लोकचळवळींचा काळ होता. महाराष्ट्रात याच काळात फुले-आंबेडकरी विचार आणि जगभरातील विविध तत्वज्ञानांशी नातं सांगणाऱ्या दलित पँथर्ससारख्या संघटना उदयाला आल्या होत्या, जातीअंताची आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक आर्थिक विषमतांना वाचा फोडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या राजकीय संघटनांचा हा कालखंड. ‘सामाजिक उत्थानासाठी लिहून चळवळीचे नेतृत्व करण्याचे मी दलित पँथर्स कडून शिकलो’ अशी ग्वाही लेखक देतात. त्यांचा हा प्रवास सुरु झाला तो औरंगाबाद शहरातील नागसेन वनातून. नागसेनवनात आंबेडकरी साहित्य, मिलिंद महाविद्यालय विद्यार्थी नियतकालिक, अनियतकालिक, नामांतर लढा, आणि मराठी वैचारिक आणि साहित्यिक विश्वातील दीपस्तंभ  ‘अस्मितादर्श’ असे सृजन घडले. आंबेडकरोत्तर महाराष्ट्रातील महत्तम संघर्ष आणि सृजनभूमी म्हणजे नागसेनवन परिसर. मोतीराज राठोड तांड्यातील लोकांनी केलेल्या लोकवर्गणीतून मिलिंद महाविद्यालयापर्यंत धडकतात. पुढे नाका कारकुनाची नोकरी करून पदवीचे शिक्षणही घेतात. वाचनातून आणि सामजिक चळवळीच्या प्रवेशातून त्यांची भूमिदृष्टी  घडते. त्यांच्या राजकीय कार्याची सुरुवात बंजारा युवक आघाडीची स्थापना करून (१९७४) करतात. याच काळात मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा सुरु झाला होता. राठोड त्या काळात बंजारा वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते. तिथेच त्यांनी नामांतर कार्यालय अशी पाटी लाऊन काम सुरु केल्यावर कार्यकारणी सदस्यांकडून विरोध झाल्याने  ती पाटी उचलून आपल्या घरी लावली आणि नामांतर कार्यालय सुरु केले. महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते, नामांतरवादी कृती समितीचे सदस्य आणि आंबेडकरी जनतेचा वावर त्यांच्या घरी असे, राठोड आणि त्यांच्या सहकार्यांनी हजारो भटक्या विमुक्तांना नामांतर आंदोलनाशी जोडले. इथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांची दृष्टी अधिक व्यापक झाल्याचे लेखक नोंदवतात. इथे लक्षात घेण्यासारखी बा हि आहे कि मोतीराज यांच्यासमोरही तोच द्वंद्व होतं जे इतर सर्व प्रागतिक आणि जाती विरोधी चळवळी समोर राहिला, तो होता जातिउन्नति आणि जातीअंताचा. भटक्या विमुक्त समूहांचे cedentarisation करायायचे म्हणजे काय त्यांना शेतकरीकरणाच्या प्रक्रियेत आणायचे, आणि त्या प्रक्रियेत एकदा ते समूह आले कि जातीच्या आकृतीबंधात framwork मध्ये हे समूह culminate होणार याची स्पष्ट जाणीव त्यांच्या लेखनात दिसते. जातीच्या आकृतीबंधात भटक्या विमुक्तांचे नियमन होणे हि प्रक्रिया एका अर्थाने जातीच्या आधुनिकतेचीही ग्वाही देते. (add the comment about colonial anthropology) भटके विमुक्त हे जरी caste outsiders असले तरी जातीच्या logic मध्ये त्यांचे संमेलन होत असते. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांनी हु वेयर द शुद्राज मध्ये मांडलेल्या वर्गविभाजनामध्ये तत्कालीन गुन्हेगार जमातींना दलित आणि आदिवासींच्या मित्र शक्ती मानले होते.  ही बाब वारंवार राठोड अधोरेखित करत राहिले. यामुळेच त्यांनी जेव्हा राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हा त्यांनी बंजारा युवक आघाडी या जातीउन्नतीच्या आकांक्षा असणाऱ्या संघटनेपासून सुरुवात केली, परंतु नामांतर चा लढा सुरु झाल्यावार जातउन्नतीवादी राजकारणाची मर्यादा त्यांच्या लक्षात आली, आणि त्यांनी नामांतरमध्ये फक्त महत्वाची भूमिकाच बजावली नाही तर जातीअंताशी त्यांची असलेली मूलगामी बांधिलकी जोपासली. भटक्या विमुक्तांमध्ये बंजारा हि काहीशी वरचढ जात असल्याने त्यांच्यात राजकीय आकांक्षा आणि जात्योन्नती झालेला वर्ग निर्माण झाला होता, त्या वर्गाने आपापल्या समूहकेन्द्री राजकारण केल्याने मोतीराज राठोड स्वतः बंजारा असूनही त्यांचा जनाधार हा बंजारा नव्हता, तर पारधी, नाथपंथी डवरी गोसावी, वैदू सारख्या अत्यंत marginal आणि शोषित पिडीत जमाती त्यांचा संघटनेचा मोठा आधार होता.   

छायाचित्र साभार - कालाताई मोतीराज राठोड

लोकचळवळी –

१९८१ च्या दरम्यान मंडल आयोगाच्या शिफारसी जाहीर झाल्या तेव्हा मोतीराज राठोड दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जे.एन.यू.) हिंदी साहित्यातून एम. फील. करत होते. बंजारा लोकसंस्कृतीवर त्यांनी आपला प्रबंध लिहिला. तांड्यात दारू पाडणाऱ्या एका लमाणाने ज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेली ही उंच भरारी होती, जे. एन. यु. स्थापन झाल्यापासून एका वर्षातच एम. फिल. संपवणारे राठोड हे पहिलेच विद्यार्थी ठरले. दरम्यान औरंगाबादच्या वसंतराव नाईक कॉलेज मध्ये प्रध्यापाकी करता करता त्यांनी ‘मंडल आयोग कार्यवाही कृती समितीची’ स्थापाना केली. समितीने राज्यभर मेळावे करत मंडल आयोगासंबंधी जनप्रबोधन मोहीम हाती घेतली. भटक्या विमुक्तांची उत्पिडीत अवस्थेतून मुक्ती करण्यासाठी कृतिकार्यक्रम त्यांनी हाती घेतले. भटक्यांची पालं जिथं थांबतात त्यांना तिथेच स्थिर होण्याचे आवाहान करणे, गायरान जमिनी ताब्यात घेणे, त्यांच्या पर्यायी उपजीविकेची सोय करणे, शासनदरबारी जमीन आणि लघुउद्योगासाठी सतत वकिली करणे अशी धडपड त्यांनी सातत्याने केली. रस्ता रुंदीकरणात जडीबुटी विकणाऱ्या वैदू जमातीचे पाल उधवस्त करण्यात आले तेव्हा त्यांनी ‘संसार चालू, रस्ता बंद’ असे आंदोलन केले.  अशा अनेक पुनर्वसन आंदोलनाच्या नोंदी पुस्तकात येतात. गायरान जमीन अतिक्रमणातून हजारो भटक्यांना स्थिर करून त्यांना शेतकरी बनविण्याचे काम आपल्या संघटनेच्याबळावर त्यांनी केले. एका प्रसंगातून या लढ्याची प्रेरणा लक्षात येते, गेवराई येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या भटक्यांना  जमिनीच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळवून दिल्यावर एका  सापवाल्याने गळ्यात साप टाकून त्यांचे अभिनंदन केले, याप्रसंगी  ‘एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात दहा फुट बाय दहा फुटाचीही मालकीची जागा नसतांना आपण देशावर पिढ्यानपिढ्या प्रेम केले आहे, आज आपण गावकरी झालो आहोत, भविष्यात एक दिवस शेतकरी होऊ’ लाखोंमध्ये संख्या असणाऱ्या भटक्या विमुक्त जमातींचा  ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ बनण्यासाठीचा हा संघर्ष हा त्यांच्या ‘भारतीय भटके विमुक्त युथ फ्रंट’नी चालविल्या आंदोलनांतून प्रदर्शित होतो.

व्यवस्थात्मक हिंसेच्या विरोधात बंड:

 संशयित गुन्हेगार म्हणून पोलिस आणि गावगुंड भटक्यांचा छळ करत असत, ढोकी हत्याकांडासारख्या अनेक घटना त्या काळात घडत होत्या. अशा भटक्यांसाठी अन्याय निवारण केंद्रच राठोड यांनी आपल्या घरी उघडले. अत्याचार झालेल्या घटनास्थळी जाणे पुरावे गोळा करणे, हस्तक्षेप करून निर्दोष भटक्यांची सुटका करणे, हिंसेसंबंधी सतत न्यायालयीन पाठपुरावा करणे असा त्यांचा ठरलेला दिनक्रम. डोंगऱ्या पारधी नावाच्या माणसाला पोलिसांनी बेदम मारहाण केली आणि शेवटी दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला, हा खटला त्यांनी लाऊन धरला, या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल ला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली, या प्रातिनिधिक केस मधून गतानुगतिक हिंसा, त्याविषयी बहुसंख्य लोकांची एकाप्रकारची मूकसंमती यांचा उलगडा वाचकांना होतो.

गुन्हेगार असल्याच्या संशयावरून भटक्यांचा होणारा छळ, हजेरी पद्धत, आणि पोलिसांच्या ट्रेनिंग अभ्यासक्रमात भटक्यांच्या विषयी पूर्वग्रह अशा मुद्द्यांना घेऊन भटक्या विमुक्तांचा एक मोर्चा मोतीराज राठोड आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई हायकोर्ट समोर एप्रिल १९८८ रोजी निघाला. डोंबारी, वासुदेव, बहुरूपी, कुडमुडे जोशी, वैदू, नंदीबैलवाले, अस्वलवाले, माकडवाले, सापवाले असे अनेक भटके समूह मुंबईत दाखल झाले. हजारो भटक्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले. या आंदोलनातील उपक्रमशीलता, त्यातील कार्यकर्त्यांची मेहनत यांचे तपशीलवार वर्णन लेखक करतात. या आंदोलनात त्यांनी पुढे ‘जमीन जुमला दखलपात्र’ आंदोलनाची घोषणा करत त्यांच्या ‘भटक्या विमुक्तांचा जाहीरनामा’ या मुलभूत ग्रंथाचे चौपाटीवरच प्रकाशन करण्यात आले. त्यांनी या संबंधी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर अंतरिम निवाडा आला भटक्यांना कुठलाही पुरावा नसताना अटक करता येणार नाही, हजेरी पद्धत रद्द, पोलीस ट्रेनिंग मधील तो पूर्वग्रहदुषित भाग वगळावा. या आदेशाची नक्कल फ्रेम करून भटक्यांनी आपल्या झोपड्या आणि पालावर लावल्याचे लेखक नोंदवतात.

छायाचित्र साभार - कलाताई मोतीराज राठोड



प्रतिकाराच्या अभिनव वाटा:

सदर राजकीय रोजनिशीची जमेची बाजू म्हणजे, एरवी ज्यांच्या कर्तेपणाची नोंद आपल्याला कुठल्याही अभिलेखागारात सापडणार नाही अशा रंगुबाई काळे, सुंदराबाई वडार, रेश्माबाई फासे पारधी अशा अनेक स्त्री पुरुषांचे कर्तुत्व अधोरेखित करायला लेखक विसरत नाहीत. ‘तुरुंग हेच आमचे घर’ आंदोलनात आपल्या जानावारांसाहित नाशिक तुरुंगात भटक्यांनी शिरकाव केला, वास्तव्य आणि कसण्यासाठी जमिनी मिळाव्या यासाठी ते आंदोलन होते, बेड्या आणि झोळीचे दहन करून, ‘धंदा परिवर्तन समाज परिवर्तन’ असे आंदोलन त्यांनी केले भटक्यांच्या नागरी जीवनाच्या आकांक्षा नेमकेपणाने यात अधोरेखित झाल्या. या आंदोलनांमधून एक गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित होते ति म्हणजे, भौतिक लढा हा त्यांच्या अजेंड्यावर होता, ‘धंधा परिवर्तन समाज परिवर्तन’ या घोषणेतून ते फक्त आर्थिक बदलाचे आवाहन करीत नव्हते तर त्या माध्यमातून भटक्या विमुक्तांच्या आत्मस्थितीमध्ये त्यांना परिवर्तन अपेक्षित होते. त्यांच्या लेखनात आपल्याला सातत्याने वर्गीय lexicons चा वापर दिसतो, ‘सर्वहारा महिला आघाडीची’ स्थापाना करण्या मागचा हेतूही तसाच काहीसा होता, महिला सबलीकरण हा त्याचा एक हेतू असला तरी महिलांची भौतिक मुक्ति पर्यायाने जात पितृसात्तेच्या विरोधातील छोटे मोठे लढे त्यांनी उभारले. 

भटक्या विमुक्तांवर अतिशय सघन लेखन राठोड यांनी केलं आहे, एक्स गुन्हेगार जमाती, भटक्या विमुक्तांचा जाहीरनामा, तांडा संस्कृती, पाल निवासी अशी छोटीमोठी किमान वीसेक पुस्तकं त्यांनी लिहिली. याशिवाय आंदोलनादरम्यान संबंधित जमातीची माहिती घेऊन त्यावर सविस्तर लेख लिहणे हा त्यांचा नित्याचा उपक्रम होता. दैनिक मराठवाडा, विमुक्त विचार, अशा पुण्या-मुंबई केन्द्री अभ्यासाने कंसात ढकलेल्या नियतकालिके, वृत्तपत्रे आणि मासिकांमधून त्यांनी केले, त्यांचा लेखसंग्रह म्हणजे मानवशास्त्रीय निरीक्षणांचा चा उत्तम नमुना आहे. पत्नी कला राठोड आणि औरंगाबाद शहरातील प्रागतिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते आणि नेते यांच्या कर्तेपणाचे दाखले या रोजनिशीच्या प्रत्येक पानावार आहेत हे विशेषत्वाने नोंदविले पाहिजे. भारतीय राज्यघटनेने दिलेले अभिवचन सामाजिक आणि आर्थिक पातळीवर नाकारला जाते, त्या नाकारला दिलेला नकार rejection of rejection. हा या ‘मुक्ती’कथनाचा गाभा आहे.


(पूर्वप्रसिद्धी - प्रबुद्ध भारत १६ ते ३१ जुलै २०२५, सदर लेख इंग्रजीतून The Wire पोर्टलवर उपलब्ध आहे) 


पुस्तकाचे नाव – मी एक गुन्हेगार

लेखक- मोतीराज राठोड

संपादन – प्रदीप खेतमर

गोल्डनपेज पब्लिकेशन – किंमत ४२५ , पृष्ठसंख्या – ३५२

सागर नाईक – sagarnaik4511@gmail.com

 

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...