तांड्यावरच्या नोंदी
शेतकरी, परात्मता, आणि सांस्कृतिक विनिमय
शेतकऱ्याच्या डोक्यात दिवसभर तिच्या कामाशी संलग्नित अनेक छोट्या मोठ्या गोष्टी सुरू असतात, तिच्या श्रमातच आत्मनिष्ठ कर्ता आकार घेत असतो. प्रत्येक हंगामात पिकांच्या बाबतीत भलेही तोच तोपणा असेल पण आव्हाने नेहमीच नवीन असतात, कधी मान्सून, कधी सरकारी धोरण, कधी व्यापाऱ्यांची साठेबाजी, कधी चक्रवाढ व्याजाचा विळखा इत्यादी. शेतीचे अरिष्ट तीव्रतर होतानाच्या काळात कर्जबाजारी असणे ही बाब सर्वत्र दिसते, पण कर्जबाजारी असणे ही बाब पुरुष शेतकऱ्याच्या कर्तेपणालाच 'ग्लानी' आणते, कर्जबाजारी असण्यामुळे एक सार्वत्रिक मानखंडना त्याच्या वाट्याला येते, अशी मानखंडणा शेतकऱ्यांचे कर्तेपण जणू खुरटवून टाकते. इमिल दुरखाईम याला social estrangement म्हणतो. एकप्रकारचे सामजिक दुरीकरण, परकेपणा किंवा परत्मता. आर्थिक 'उन्नतीच्या' आकांक्षा याला कारणीभूत असतात असं तो म्हणतो.
याचसोबत आलेली एक नवीन चिन्हव्यवस्था म्हणजे लग्नातील लावाजमा, अनावश्यक खर्च, कर्मकांड, सामजिक प्रतिष्ठेसाठी केले जाणारे सोपस्कार अशा न संपणाऱ्या खर्चिक बाबींच्या जंजाळात ती व्यक्ती अडकते याने तो दुभांगलेपणा आणखीनच वाढत जातो असं दिसतं.
या सर्व गतानुगतिक परात्मतेतून जो काही फावला वेळ मिळतो त्यात ती व्यक्ती स्वतः ला गुंतवते, विशेषतः परंपरा असे अवकाश त्यांना देत असते. तांड्याच्या संदर्भात होळीचं उदाहरण घेता येईल. डफ वाजवणे, लयबध्द ठेका घेत एका सुरात "भोळो राम गयो बनवास" अशी गीतं म्हणतात. हा संस्कृती विनिमय सुद्धा तीच शेतकरी स्त्री पुरुष करत असतात. असे संस्कृती विनिमय निकोप पणे व्हावे त्याला परात्मता, विवंचना, दुःखाने ग्रासलेले नसावे यासाठी काय करता येईल हे कदाचित unthinkable वाटू शकेल, त्यासाठी पुन्हा परतीचा मार्ग नाही. कुठल्याही जीर्णोद्धारवादी (देशीवादी) पद्धतीनेही ते शक्य नाही, तर तसे निकोप विनिमय अवरुद्ध करणारे, त्याला असंख्य पाशांनी जखडून ठेवणाऱ्या व्यवस्थांना बदलूनच ते शक्य आहे.
No comments:
Post a Comment