Thursday, May 7, 2026

फ्लॅन्यूअर

आज ब्लॉगचं नाव बदलून फक्त “नोंदवही” असं केलं. आधीचा “दस्तावेजकार” असा अचानक गायब का झाला? हा प्रश्न आपल्याला पडला असेल. परीघाबाहेरील कथनं, स्मृती आणि इतिहास प्रकाशात आणण्यासाठी केवळ लिखित दस्तावेजच पुरेसे असतात का ? असा प्रश्न पडल्यावर, गेल्या पाच वर्षातील दस्तावेजांसाठीच्या भटकंतीअंती तरी या प्रश्नाचं उत्तर ‘पुरेसं नाही’ असं मिळालं. 

त्यामुळे Archive (संग्रह/अभिलेखागार/पुराभिलेखागार) नावाची आधुनिक संस्था कशी उदयाला आली याचा क्लिष्ट परंतु आवश्यक धांडोळा घ्यावा लागेल.

पुराभिलेखागार, धुरिणत्व आणि सत्ता संबंधाची चिकित्सा: 

पुराभिलेखागार सकृतदर्शनी निरपेक्ष असा अवकाश वाटत असला तरी पुराभिलेखागार आणि दस्तावेजीकरणाची प्रक्रिया ही सत्तासंरचनेत जखडलेली आणि त्या हितसंबंधांनी बाधित अशी space असते असे विविध अभ्यासक दाखवून देतात. ऐतिहासिक साधनांचा संग्रह हा केवळ निरपेक्ष प्रांत नसून, सत्ता, अधिकार आणि वर्चस्व (hegemony) निर्माण करण्यासाठी पूरक अशी संस्थात्मक रचना निर्माण करणारी कृतीही ठरते. पुराभिलेख संग्रहांच्या इतिहास व कार्यांचा सैद्धांतिक अभ्यास करणारे जॅक देरीदा, अ‍ॅन लॉरा स्टोलर, मिशेल-रॉल्फ त्रुइयो, टेरी कुक, अ‍ॅचिल म्बेंबे, व्हर्न हॅरिस सारखे विचारवंत अभिलेख संग्रहांना ज्ञाननिर्मिती, सामुहिक स्मृतींचे नियंत्रण आणि राजकीय वैधतेच्या प्रस्थापनेची केंद्रस्थाने म्हणून पाहतात. 

जॅक देरीदा संग्रहाच्या संकल्पनेला arkhē या ग्रीक संज्ञेशी जोडतो, या शब्दाचा अर्थ अर्थ एकाच वेळी ‘प्रारंभ’ (commencement) आणि ‘आदेश’ (command) असा होतो. देरीदाच्या मते अभिलेख संग्रह हे स्मृतीचे निष्क्रिय भांडार नसून, कायदा, अधिकार आणि विशिष्ट प्रकारच्या ऐतिहासिकतेला अधिकृत दर्जा प्रदान करणारी संस्थात्मक यंत्रणा असते. ज्या वर्गांचे संग्रहावर नियंत्रण आहे, ज्यांना तिथे मुक्त प्रवेश शक्य असतो व जे समूह त्यांचा अर्थ लावतात तेच पर्यायाने विशिष्ट प्रकारच्या ‘ऐतिहासिकतेचे’ नियंत्रण करतात. 

अ‍ॅन लॉरा स्टोलर यांनी वसाहतीकरणाच्या संदर्भात पुराभिलेख संग्रहांची चिकित्सा केलेली आहे. त्यांच्या मते वासाहतिक पुराभिलेख हे वासाहतिक सत्ता आणि तर्क बळकट करण्याचे साधन असल्या कारणाने त्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पुराभिलेख संग्रहांना ‘विरुद्ध दिशेने’ (reading against the grain) वाचण्याऐवजी ‘त्याच प्रवाहात’ (reading along the grain) वाचायला हवे. वासाहतिक प्रशासकीय दस्तावेजांमधील अध्याहृत वंशवाद आणि त्याचा ज्ञानशास्त्रीय पाठपुरावा त्यांनी आपल्या अभ्यासातून पुढे आणला आहे. अशा प्रकारे पुराभिलेख संग्रह हे वसाहती सत्तेचे तंत्र (technologies of governance) म्हणून कार्य करतात व त्यासह सत्तेचे पुनरुत्पादन करून ‘वसाहतीक मानस’ (colonial common sense) घडवतात असं त्या स्पष्ट करतात. 

मिशेल-रॉल्फ त्रुइयो त्यांच्या बहुचर्चित silencing the past या ग्रंथात इतिहासलेखनाच्या प्रक्रियेत सत्तेची भूमिका चार टप्प्यांवर स्पष्ट करतात. एक घटना घडणे, दुसरे त्यांची नोंद होणे, तिसरे ती संग्रहित होणे आणि चौथे तिचे कथनात रूपांतर होणे. या प्रक्रियेत संग्रहांना मध्यवर्ती महत्व प्राप्त होतं. त्यांच्या मते संग्रह काही कथानके काही आवज यांना वगळतात तर काहींना विशेष स्थान देतात. त्यामुळे संग्रह हे इतिहासकथनात ‘मौन’ (silences) निर्माण करतात. काही कथानकांची ही वगळणूक सत्ता संरचनेच्या गरजेपोटी निर्माण होते. त्या-त्या समाजातील प्रभुत्वशाली वर्ग याद्वारे इतिहासलेखन आणि सामुहिक स्मृती यावरील आपले वर्चस्व आणि ताबेदारी कायम ठेवतो. 

टेरी कुक यांनी संग्रहव्यवस्थापानाच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. त्यांनी त्यातील ‘तटस्थता’ आणि ‘व्यावसायिक वस्तुनिष्ठता’ या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याच्या मते दस्तऐवजांचे मूल्यांकन (appraisal) ही एक राजकीय प्रक्रिया आहे, कारण त्यातूनच कोणती स्मृती टिकेल आणि कोणती नष्ट होईल याची दक्षता घेतली जाते. म्हणून संग्रहव्यवस्थापनातून संस्थात्मक सत्तेचे पुनरुत्पादही होत असते असे त्यांचे मत आहे. 

अ‍ॅचिल म्बेंबे संग्रहांकडे राज्यसत्तेची संस्था म्हणून पाहतात. त्याच्या मते संग्रहांच्या निवड आणि वगळणीतून त्या सत्तेचे प्रत्यंतर घडते. संग्रह हे political subjects घडवत असतात. कोणते दस्तऐवज ‘संग्रहणीय’ ठरतात आणि कोणते ‘असंग्रहणीय’ राहतात, राजकीय अधिसत्ता बळकट होण्याची प्रक्रियाही संभवते. मौखिक परंपरा, हिंसेचे अनुभव, विस्थापनसारखी कथानके म्हणूनच परिघाबाहेर राहतात अशी मांडणी ते करतात. 

व्हर्न हॅरिस यांनी दक्षिण आफ्रिकेतील अपरथाइड राजवटीच्या संदर्भात संग्रहांचा अभ्यास केलेला आहे. अपरथाइड राजवटीतील प्रशासकीय अभिलेखागार वंशवादी राजवट अधिक व्यवस्थितपणे चालवण्यासाठी निर्माण केले गेले. इथे संग्रहांची निर्मिती आणि वापर बहुसंख्य काळ्या लोकांवर नियंत्रण आणि पाळत ठेवण्याचे साधन म्हणून केला गेला. यातून संग्रह कधीही तटस्थ नसतात तर ते नेहमीच राजकीय संघर्षांनी व्याप्त असतात असे हॅरिस अधोरेखित करतात. 


वरील विवेचनावरून असं कोणी मानू नये कि आपण दस्तावेजांना ‘सिरे से खारीज’ करत आहोत, तर त्याचा अर्थ इतकाच आहे कि दस्तावेज आणि विशेषतः संस्थात्मक दस्तावेजांची आणि संग्रहांची (सत्तासंबंधांमुळे) एक अंगभूत मर्यादा असते, त्या मर्यादांच्या पलीकडे बघण्यासाठी आपल्याला “फ्ल्यान्यूर” मदत करतो.

वॉल्टर बेंजामिनचा फ्लॅन्यूअर (Flâneur) :

फ्लॅन्यूअर (Flâneur) या फ्रेंच शब्दाचा अर्थ "शहरात उद्देशहीन भटकणारा मनुष्य" असा होतो. बेंजामिनने या ‘उद्देशहीन’ संकल्पनेला सखोल तात्त्विक आणि ऐतिहासिक अर्थ दिला. बेंजामिन चा फ्लॅन्यूअर हा फक्त “भटकणारा” नसून आधुनिक भांडवलशाही समाजाचा एक विशिष्ट प्रकारचा निरीक्षक (observer) आहे. फ्लॅन्यूअर त्रयस्तपणे शहराचा अनुभव घेतो. त्याच्याच शब्दात सांगायचे झाल्यास “The flâneur is the observer of the marketplace.” मार्केट म्हणजे फक्त बाजारपेठ असा मर्यादित अर्थ त्याला अभिप्रेत नाही, तर आधुनिक समाजात समग्र मानवी जीवनाला व्यापलेल्या ‘वस्तूकरणा’चं तो निरीक्षण करतो. कला-साहित्यापासून ते मानवी संबंधाचेदेखील ज्या भांडवली समाजात वस्तूकरण झालं आहे, फ्लॅन्यूअर हा त्या वस्तुमय जागचा (commodity world) निरीक्षक आहे. 
“Phantasmagoria” हा बेंजामिन च्या विचारातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ, स्वप्नवत दृश्य (illusion, spectacle). भांडवलशाहीच्या झगमगाटात एका प्रकारचे सामुहिक स्वप्नरंजन (collective dream) असते. फ्लॅन्यूअर त्या स्वप्नात फिरतो परंतु त्याच्या “आभासाला” देखील ओळखून असतो. आधुनिकतेच्या आभास (illusion) आणि वास्तवाच्या (reality) मध्येही तो commodities मागील सामाजिक संबंध समजून घेत असतो.

आता या सर्वांचे काय ? 

आपल्या जगप्रसिद्ध Theses on the Philosophy of History या निबंधात बेंजामिन जेत्यांच्या कथनातून नाही तर भूतकाळातील हिंसा आणि अवशेष यांच्या आधारे इतिहासाकडे बघण्याचा आग्रह धरतो. तो इतिहासाला स्मारकांमध्ये नाही, तर अवशेषांमध्ये शोधतो; अधिकृत संग्रहांमध्ये नाही, तर शहराच्या विस्मृतीत गेलेल्या कोपऱ्यांमध्ये शोधतो. त्याच्यासाठी इतिहास हा मृत भूतकाळ नसून वर्तमानात सतत चमकून दिसणारा अनुभव आहे. फ्लॅन्यूअर साठी इतिहास हा “पूर्ण झालेला भूतकाळ” नसतो तर तो वर्तमानाच्या पृष्ठभागांमध्ये जिवंत असतो. फ्लॅन्यूअर इतिहासाला संग्रहालयातील बंदिस्त दस्तावेज म्हणून पाहत नाही. तो म्हणतो 

“History decays into images, not into stories.”

(The Arcades Project, p. 476.) 

त्याच्या मते इतिहास हा एकसंध कथन नसून तो तुकड्यांमध्ये आणि प्रतिमांमध्ये विखुरलेला असतो. फ्लॅन्यूअर या विखुरलेल्या खुणांना जोडतो. त्यामुळे तो इतिहासाची “पुनर्रचना” करत नाही तर इतिहासाच्या अवशेषांचे अर्थनिर्णयन करतो. फ्लॅन्यूअर वर्तमानात दडलेल्या इतिहासाला शोधतो, त्यासाठी त्याने dialectical image नावाची संकल्पना वापरली आहे. 
“Image is that wherein what has been comes together in a flash with the now to form a constellation.”

(The Arcades Project, p. 462.)

याचा अर्थ असा की भूतकाळ आणि वर्तमान हे वेगळे नसतात. वर्तमानातील एखाद्या दृश्यामध्ये भूतकाळ अचानक चमकून दिसतो. हा क्षण म्हणजे इतिहासाच्या जाणीवेचा क्षण असतो. Flâneur अशा क्षणांचा शोध घेतो. तो वर्तमानाला केवळ समकालीन म्हणून पाहत नाही तर त्यामध्ये गाडलेला इतिहास शोधतो. तो इतिहासाला विस्मृतीत गेलेल्या अनुभवांच्या आधारे समजून घेतो. 

बेंजामिन च्या दृष्टीने इतिहासाचे आकलन म्हणजे “भूतकाळ जसा होता तसा” मांडणे नव्हे. तर,

“To articulate the past historically does not mean to recognize it ‘the way it really was’… It means to seize hold of a memory as it flashes up at a moment of danger.”

(Theses on the Philosophy of History, Thesis VI.)

म्हणूनच फ्लॅन्यूअर इतिहासाला निश्चित सत्य म्हणून पाहत नाही तर त्याला स्मृती म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतो. 

प्रचलित दस्तावेजांमध्ये अशाप्रकारे दडपले गेलेले कथन, स्मृती आणि इतिहास काही ठिकाणी सापडू शकतात, परंतु त्याच सोबत अवशिष्ट स्वरूपात किंवा नेणीवेत दडपलेल्या स्मृती, कथनं आणि इतिहास शोधण्यासाठी आपल्याला फ्लॅन्यूअर सारखी मुशाफिरी करावी लागेल. असे अनियमित लेखन “नोंदवही” मध्ये नोंदवून ठेवणार आहोत.

No comments:

Post a Comment

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...