Friday, December 2, 2022

कायरन पोलार्ड: द लेजंड

बावीस वर्षांच्या एका कॅरेबियन खेळाडूने २००९ सालच्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेमध्ये पदार्पण केलं. जगभरातील आघाडीचे फ्रेन्चाइजी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट वगळता देशाच्या सीमा ओलांडून व्यवसायिकदृष्ट्या भरणाऱ्या क्रीडा स्पर्धेतील संघ) क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी होते. त्रिनिदाद आणि टोबॅगोकडून खेळणारा हा साडेसहा फूट उंचीचा खास वेस्ट-इंडियन खेळाडू स्वतःची अनोखी हेअरस्टाईल घेऊन मैदानात उतरला होता. त्याच्या डोक्यावर कानशिलाच्या वरच्या बाजूला 20 – 20 असं कोरलेलं होतं. तो ट्वेन्टी-२० या क्रिकेट फॉरमॅटचा ब्रँड अॅम्बेसेडर होईल, याची कदाचित त्यालाही त्या वेळी कल्पना नसेल. पण सूचक अर्थाने त्याची हेअरस्टाईल क्रिकेटमधील एका ऐतिहासिक पर्वाची नांदी होती. तो हलक्या हाताने बॅटची मूठ पकडत असे. खेळपट्टीवर आल्या-आल्या बेल्स ठोकून सज्ज होणारा शिवनारायण चंद्रपॉल नंतरचा खेळाडू म्हणजे पोलार्ड. २००९ साली ‘चॅम्पियन्स लीग टी-२०’मध्ये न्यू साउथ वेल्सविरोधात खेळताना पोलार्डने १८ चेडूंमध्ये ५४ धावांची खेळी करत ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये दणक्यात आरंभ केला. त्यानंतरची त्याची कारकीर्द इतिहास रचणारी ठरली. पुढे किमान दशकभर तरी पोलार्डने जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. भारताशी या पोलार्डचं विशेष नातं राहिलं, तो मुंबई इंडियन्स या जगातील सर्वाधिक यशस्वी क्रिकेट फ्रेन्चाइजीचा अविभाज्य भाग राहिला, या संघाच्या यशामध्ये पोलार्डचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. कायरन पोलार्डने नुकतंच आयपीएलमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं, त्यामुळे आता त्याच्या चाहत्यांना तो पुन्हा क्रिकेट खेळताना दिसणार नाही, त्याचा अलविदा हा क्रिकेट चाहत्यांना सलणार आहे.ख्रिस गेल, एबी डीव्हीलीयर्स आणि कायरन पोलार्ड हे तीन खेळाडू आपल्या मायदेशात नसतील तितके भारतात लोकप्रिय आहेत, आणि त्याला एक साहजिक कारण आहे, या तिघांनीही आयपीएलला भरभरून दिलं, त्यांचे खेळपट्टीवरील कारनामे इथल्या चाहत्यांना प्रसंगी स्तिमित करणारे ठरले. या तीन खेळाडूंच्या फळीतील शेवटचा पोलार्डसुद्धा निवृत्त झाला आहे.त्यानिमित्ताने पोलार्डच्या कारकीर्दीचा हा संक्षिप्त आढावा.

वेस्ट इंडीज क्रिकेटच्या इतिहासातील कुठल्या टप्प्यावर कायरन पोलार्डसारखा खेळाडू पुढे आला, हे सुरुवातीला पाहू. जुन्या पिढीतील लोकांना विचारलं तर त्यांना रॉबर्ट्स, गार्नर, होल्डिंग यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांची नक्कीच आठवण येते, आजतागायत अशा प्रकारची वेगवान गोलंदाजी अपवादानेच कोणी केली आहे. मग असं काय घडलं ज्यामुळे नव्वदच्या दशकानंतर वेस्ट इंडीज संघ रसातळाला गेला, आणि ट्वेंटी-२० क्रिकेटच्या उगमानंतर पोलार्डसारखे धिप्पाड खेळाडू अधिकाधिक स्लो बोलर्स झाले? ड्वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमीसारखे अष्टपैलू खेळाडू अधिकाधिक संथ गतीने गोलंदाजी करण्यात सरस होऊ लागले. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डामध्ये आलेलं एकप्रकारचं साचलेपण, हे यामागचं कारण होतं. वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंना समाधानकारक मोबदला मिळत नव्हता. अशात कॅरेबियन बेटांमधील अॅथलीट आता क्रिकेट सोडून बास्केटबॉलसारख्या खेळाकडे आकृष्ट झाले, अमेरिकन लीग्समध्ये खेळून या बास्केटबॉलपटूंची चांगली कमाई होऊ लागली. दरम्यान, क्रिकेटपटूंच्या मदतीला ट्वेंटी-२० फ्रँचाईज क्रिकेट आलं, आयपीएलसारख्या क्रीडास्पर्धांद्वारे त्यांना कमाईचे मोठं साधन उपलब्ध झालं. त्यांच्यासाठी मोठमोठ्या बोली लागायला सुरुवात झाली, आणि अशाप्रकारे ट्वेंटी-२० ब्रँडच्या क्रिकेटचा उदय झाला. पोलार्ड हा या ब्रँडचा महत्वाचा शिलेदार होता असं म्हणता येईल. त्याने आपला खेळ ट्वेंटी-२० फॉरमॅटला कसा पूरक ठरेल याच दिशेने विकसित केला.

ट्वेंटी-२० क्रिकेटच्या उदयासोबतच जुन्या खेळाडूंनी आणि क्रिकेटप्रेमींनी ‘हे टेस्ट क्रिकेट सारखे प्युअर क्रिकेट नव्हे’ अशा प्रकारची टीका करायला सुरुवात केली. त्यात बऱ्याच अंशी तथ्य असले तरीही ट्वेंटी-२०मध्ये प्रत्येक बॉलवर, प्रत्येक शॉटवेळी किंवा एखाद्या ओव्हरमध्ये काय घडतं त्यावर खेळाची दिशा बदलत असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची ढील न देता प्रत्येक शॉटचा किंवा बॉलचा आणि सर्वार्थाने खेळाडूंच्या क्रिकेटिंग कौशल्याचा कस तिथे लागतो. ट्वेंटी-२० ला आवश्यक अशा या सर्व बाबींसाठी पोलार्ड हा ‘परफेक्ट पॅकेज’ होता. ट्वेंटी-२० मध्ये सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘फिनिशर’ची भूमिका तो निभावायचा-सुरुवातीची इनिंग असेल तर फटकेबाजी करून पोलार्ड त्याच्या संघाला जोरकस धावसंख्या उभारण्यासाठी बळ पुरवत असे किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर ठरलेल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक संयमी खेळीसुद्धा तो करत असे.. दशकभराहून अधिक काळ त्याने या दोन्ही भूमिका शिताफीने पार पाडल्या. त्याचा ‘चीप शॉट’ (अलगद उचलून मारणं) किंवा ‘फ्लिक’सारखी सुरेख फटक्यांची शैली क्वचितच अन्य कोणा खेळाडूमध्ये दिसते. ताकदीपेक्षाही त्याचा भर टायमिंग साधण्यावर असायचा.

याशिवाय तो काही महत्वाच्या ओव्हर्स टाकायचा, पोलार्डने त्याच्या संथ गोलंदाजीवर भरपूर काम केलं होतं. त्याने संथ गोलंदाजीने (स्लोअर वन्स) आणि बाउंसर्स टाकून प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचे बळी घेत विजय खेचून आणल्याची अनेक उदाहरणं आहेत. फिल्डिंग करताना चमत्कार वाटू शकतील असे अनेक झेल त्याने घेतलेले आहेत. वास्तविक पोलार्डचं शरीर धिप्पाड आहे, अशा शरीरासह क्षेत्ररक्षणात त्याने विस्मयकारक कामगिरी करून दाखवली. याचा साधा अर्थ असा होता की त्याने स्वतःला अष्टपैलू क्रिकेटपटू बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती, त्याने नेहमीच प्रशिक्षणावर भर दिला. आपल्या आयपीएल संघाला बहुतांश वेळा विजय मिळवून देणारे पोलार्ड सारखे कॅरेबियन खेळाडू वेस्ट इंडीज क्रिकेटला मात्र काही भरीव योगदान देऊ शकले नाहीत. तथापि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ट्वेंटी२०चे दोन विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकले हि अत्यंत उल्लेखनीय बाब होती. असे असले तरीही एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये या संघाची ससेहोलपट मात्र कायम राहिली. ती आताही तशीच होत आहे.

ती ससेहोलपट वेस्ट इंडीज क्रिकेटच्या अंतर्विरोधाचे अपत्य आहे. पोलार्डने फ्रँचाईज संघाला प्रसंगी स्वतःच्या देशाच्या संघापेक्षा जास्त महत्व दिलं. 2010 मध्येच त्याने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा मुख्य करार फेटाळत स्वतः ला ट्वेंटी-२० लीगसाठी प्राधान्याने उपलब्ध ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो स्वतःला ट्वेंटी-२० फ्रीलान्सर (विशिष्ट संघाला बाध्य न राहता मुक्तपणे ट्वेंटी ट्वेंटी लीग्स खेळणारा) म्हणून बघणं अधिक पसंत करत होता. त्यामुळे जुन्या पिढीतील दिग्गज क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी त्याच्यावर टीका केली होती. होल्डिंग यांच्या मते पोलार्ड क्रिकेटरच नाहीये. कारण एके काळचे ‘कलीप्सो क्रिकेट’(वेस्ट इंडीजमधील लोकगीतांची परंपरा, यात क्रिकेटवर शेकडो गाणी सामान्य जनतेनी रचलेली आहेत, म्हणून वेस्ट इंडीज क्रिकेट ला ‘कलीप्सो क्रिकेट’ असंही म्हणतात) आता हळूहळू लोप पावलं, त्यातली सामूहिक प्रेरणा कमी होत गेली आणि वैयक्तिक दृष्टिकोनामुळे वेस्ट इंडीज क्रिकेटचा दबदबा जवळपास संपुष्टात आला. परंतु होल्डिंग यांच्या काळातील क्रिकेट आणि आताचे क्रिकेट याचे संदर्भ अंतर्बाह्य बदलून गेलेले आहेत. क्रिकेटने आता राष्ट्रीयसीमा ओलांडून एका बाजारकेन्द्री युगात प्रवेश केला आहे, अशात वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डकडून जुजबी अर्थसहाय्यमिळत असेल तर साहजिकच खेळाडूंचा ओढा लीग क्रिकेटकडे अधिक जाईल. कायरन पोलार्ड आणि त्याची पिढी ही एका अर्थाने वेस्ट इंडीज क्रिकेटच्या शोकांतिकेचीही प्रतिनिधी आहे.

‘तुम्हाला लेजंड (उत्तम कामगिरीमुळे दंतकथासदृश स्थान लाभलेला) म्हणून ओळखलं जावं असं वाटतं की मर्सिनरी (दुसऱ्या देशासाठी युद्ध लढणारा भाडोत्री सैनिक; पोटार्थी) म्हणून?’ असा प्रश्न एकदा पोलार्डला विचारण्यात आला, तेव्हा त्याचं उत्तर होतं ‘दोन्ही!’. प्रश्नकर्त्याने कुठले नैतिक निकष लाऊन हा प्रश्न विचारला यात न जाता भारतातील क्रिकेट चाहते पोलार्डला मात्र ‘लेजंड’ म्हणूनच ओळखतील. आपल्या खेळात उत्तरोत्तर नैपुण्य मिळवत राहणं आणि ज्या कुठल्या संघासाठी आपण खेळत असू तो संघ जिंकावा हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवणं, हे कोणत्याही खेळातलं एक वैश्विक मूल्य आहे. या मूल्याची जपणूक करत पोलार्डने असंख्य क्रिकेट चाहत्यांना भरभरून आनंद दिला. त्यामुळे पोटार्थी कारणामुळे त्याला त्याच्या मायभूमीच्या, म्हणजे वेस्ट इंडिजच्या संघापासून दूर जावं लागलं असलं तरी व्यापक अर्थाने क्रिकेट या खेळातील ‘लेजंड’ हीच त्याची ओळख राहील.

© सागर नाईक

sgaranaik4511@gmail.com



सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...