डी कलोनियल थियरी चा पेपर शिकतांना आम्हाल एक interesting assignment दिली गेली ती म्हणजे तुमचा इंग्रजी शिकण्याचा अनुभव लिहून काढा. मी जेव्हा लिहायला बसलो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी एकाच वेळी रीकॉल होत होत्या. पण सुरवातीपासून लिहावे असे वाटले.
तांड्यावरच्या
मुला-मुलींचा पहिला संघर्ष हा मराठी शिकण्यासोबतचा असतो. इंग्रजी तर खूप दूरवर ची
गोष्ट असते. इयत्ता ५ वी पर्यंत मला ‘आत येऊ का’ याचा अर्थ नेमका काय होतो ते
माहित नव्हते, बस इतकेच की आत येऊ का असे बोलल्याशिवाय तुम्ही वर्गात जाऊ शकत
नाही. म्हणजे थोडक्यात आत येऊ का हा पासवर्ड होता. जसा तो पासवर्ड उमगण्यात खूप
उशीर झाला तसाच उशीर तांड्यावरच्या बहुतांशांना इंग्रजी भाषेचा intellectual password अक्सेस करण्यात होतो. मग
शाळांमधूनच जो dropout होतो तो dropout नसून exclusion असतो. या dropout चे कारण जसे
उसतोडणी किंवा मजुरीला जाणे असते तसेच भाषिक न्यूनगंडही असतेच असते.
तर आपल्या मुळ मुद्यावर
येऊ, तांड्यावरील बहुतांश मुलांचे तथाकथित मराठी उच्चार अशुद्ध (?) असायचे
त्यामुळे शिक्षकांपासून ते वर्गमित्रांपर्यंत ते उच्चारण म्हणजे रोजच्या अखंड
चेष्ठेचा विषय असायचे. आमचे बहुतांश शिक्षकं तांड्यावरच्या मुला मुलींना
याडी-कोंडा असे तुच्छतेने बोलायचे. (याडी म्हणजे आई आणि कोंडा हा शब्द इतरेजनांसाठी
वापरला जाणारा शब्द). आताही बहुतांश विद्यार्थ्यांचा अनुभव तोच आहे. याडी कोंडा
म्हणून अजूनही हिणवले जाते. सततची वेगळेपणाची भावना आणि परत्मिकरण तांड्यावरच्या प्रत्येकाच्या वाट्याला
वर्गात बसताना, वाचताना, शाळेत वावरतांना यायची. भाषिक न्यूनगंडाची भावना इतकी
शिगेला असायची की काही काहींना आपले नाव हे हास्यास्पद आहे असे वाटायचे,
नावाबद्दलचे गिल्ट शाळेत सामूहिकरीत्या दिले जायचे ( उदाहरणार्थ आमच्या वर्गातील
जोतीराम, तोळाराम, जोतीबाई इत्यादी). त्यात मग वडिलांचे नाव वर्गात जाहीरपणे घेण्यात
तर फारच लाज वाटायची कारण तांड्यावर जुन्या पिढीचे नाव ठेवण्याचे तथाकथित संस्कृतीकरण
आणि शुद्धीकरण झालेले नव्हते म्हणून परंपरागत चालत आलेली नवे असायची उदाहरणार्थ सोमा,
भंगी, गबरू, उखा, पेमा इत्यादी इत्यादी अनेक. राजू तडवी नावाच्या माझ्या मित्राने
माझी शाळा या विषयावर इयत्ता १० वी च्या सत्र परीक्षेत लिहिलेल्या निबंधाचे आमच्या शिक्षकानी वर्गात जाहीररीत्या
वाचन करून त्याच्या अशुद्ध (?) भाषेवरून त्याची मानखंडना केली होती. भाषेच्या या
रोजच्या संदर्भाला आणि न्यूनगंडाला आम्ही सर्वांनी internalize म्हणजे आत्मसात केले होते.
मला
क्रिकेट चे वेड होते. त्यामुळे रेडियो माझा कायमचा सोबती होता. हर्षा भोगले, Alan Wilkins, सनी गावस्कर, रवी शास्त्री यांच्या कमेंट्री ने मला
इंग्रजीची तोंडओळख करून दिली. मला आमच्या वर्गात इंग्रजीमध्ये अव्वल मार्क्स
मिळायची. मला इंग्रजी मराठीपेक्षा जवळची वाटायची कारण इंग्रजी मध्ये मला स्वत:च्या
अस्तीत्वाचा अवकाश दिसायचा. इंग्रजी आली की मराठीच्या अशुद्ध उच्चारांमुळे होणारी
मानखंडना आपल्या वाट्याला येणार नाही असे वाटायचे. आपल्याला याडी म्हणून कोणी
चिडवणार नाही अशीही भ्रांत आशा वाटायची. परंतु भाषांमध्ये सत्तासंबंध असतात असे
हळूहळू उलगडत गेले. हे सर्व लिहून काढतांना तीव्रतेने असे वाटत आहे की जसे गणेश
देवी म्हणतात तसे प्रत्येक भाषेत ज्ञान असते, मग त्या ज्ञानाची देवाणघेवाण करून
आपण मानवतेचे सृजन का घडवीत नाही?... हा एक यु(झु)टोपियाही असू शकतो..............
माझ्या मते प्रत्येक भाषा हि आई आहे आणि ती तुम्हाला जवळ
करते. कधीकाळी जवळची न वाटणाऱ्या मराठीतच मला व्यक्त व्हावे वाटते आहे, इतके मला
मराठीने जवळ केले आहे,.