डॉ. दिलीप चव्हाण यांची कोरोना आणि स्त्रीपुरूष विषमतेचा प्रश्न या पुस्तिकेचं प्रकाशन काल झालं. लेखकाशी संवादाचा कार्यक्रम होता म्हणून एक प्रश्न विचारला की पुस्तिका म्हणजे काहीतरी non academic आणि rhetorical वैगरे असतात असा समज आहे. अशा अस्सल आणि जैविक ज्ञाननिर्मितीला किमानपक्षी academic dignity सुद्धा मिळत नाही हे कसे काय? त्यावर त्यांनी उत्तर दिले की पुस्तिका या व्यापक समाज परिवर्तनाचा ध्येयवाद ठेवून लिहिल्या जातात, मान्यता वैगेरे मिळवण्याचा हेतू त्यात कधी नसतोच मुळात. चव्हाण सर हे दीर्घकाळ हा ध्येयवाद उराशी बाळगून लेखन करत आलेले आहेत. त्यातील मांडणी किती मूलगामी स्वरूपाची आणि वास्तवाला भिडणारी आहे हे कुठलीही सुज्ञ व्यक्ती सांगू शकेल.
ज्ञानाला प्रतिष्ठा असावी असा माझा अत्यंत रास्त आशावाद आहे. मध्यंतरी कॉम्रेड नजुबई गावितांकडे गेलो होतो. त्या आठवणी सांगताना म्हटल्या की मला प्राध्यापक लोकं प्रश्न विचारता की कादंबरी आणि आत्मचरित्र तुम्हीच लिहिलं होतं की कॉम्रेड शरद् पाटलांनीच ती लिहून तुमच्या नावाने छापली? किंवा लोकं कुजबुज तर करतातच की नजुबईंनी आत्मचरित्र आणि कादंबरी लिहिली नसावी. शोधाशोध केल्यानंतर नजुबाईंचे 'तृष्णा' आणि 'भिवा फरारी' चे हस्तलिखित मिळाले (नजुबईंच्या अक्षरातील) ज्यांनी परिवर्तनासाठी आयुष्य वेचले, जैविक ज्ञानानिर्मिती केली त्यांच्यावर अशी शंका घेतली जाते ही बाब उद्विग्न करणारी आहे. याउलट विद्यापीठांमध्ये इंग्रजीतून काहीतरी रखडलेले असते, संदर्भांची जंत्री असते, आणि कृत्रिम अनुभवांची मांडणी केलेली असते अशा लोकांची पुस्तकं पेंग्विन छापते त्यांना जगभर मान-सन्मान मिळतो, मान्यता मिळते, त्यांचा वास्तवाशी किमान संबंध असतो. त्यांना ती मान्यता मिळावी, बेलाशक कोणीही ती पुस्तकं छापावित आणि सेलिब्रेट करावी, पण नाजुबईंच्या आणि पुस्तिका लिहिणाऱ्या कार्यकर्त्या अभ्यासकांच्या कामाला किमानपक्षी dignity यावी, त्यांची अप्रतिष्ठा होऊ नये इतकीच माफक अपेक्षा.