Wednesday, April 8, 2026

एका मंडलयात्रीचे निर्वाण …

‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’ चे संस्थापक शब्बीर अन्सारी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख

१९४८ साली हैद्राबाद संस्थानात ‘पोलीस ऍक्शन’ दरम्यान या संस्थानाच्या क्षेत्रात येणाऱ्या जालन्यातील अन्सारी कुटुंबाने पलायनाचा निर्णय घेतला. रात्रीच्या काळयाकुट्ट अंधारात पाच सहा जण हातात कंदील घेऊन अन्सारी कुटुंबाचा शोध घेत होते. हे शोधाशोध करणारे साळी गल्लीतील हिंदू विणकर होते. अन्सारी कुटुंबातील हबीबा बी गरोदर होत्या आणि अशा स्थितीत त्यांनी वणवण भटकणे योग्य नाही, असं सांगत हिंदू विणकरांनी अन्सारी कुटुंबियांची समजूत काढली. इतकंच नव्हे तर, ‘आमचा जीव गेला तरी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू’, याची खात्रीही दिली. पुढे ऑक्टोबर १९४८ मध्ये  हबीबा बी यांच्या पोटी शब्बीर अहमद अन्सारी यांचा जन्म झाला. रात्रीच्या अंधारातील समता आणि बंधुत्वाचा तो कंदील पुढे ओबीसी चळवळीसाठी आपले आयुष्य वेचून शब्बीर अन्सारी यांनी तेवत ठेवला. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या विचारकार्याला आदरांजली म्हणून हा लेखप्रपंच.

२०२४ साली प्रकशित झालेले राजकीय आत्मवृत्त

धडपड्या कार्यकर्ता

सकाळी डबलरोटी कारखान्यात काम, दुपारी शाळा, सायंकाळी सुताच्या कांड्या तयार करणे, कपड्यांची तुरपई आणि काचबटण करणे अशा परिस्थितीही त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. पुढे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी मुंबई जायचे ठरवले परंतु शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परत जालन्याला येऊन त्यांनी मास्टर टेलर्स म्हणून नावलौकिक मिळवले. पुढे त्यांची धडपड वाढत गेली मुंबईतील एका होजिअरी फॅक्टरी मध्ये नोकरी करत असताना त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. याच दरम्यान, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समूहांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या मंडल आयोगाने आपला अहवाल १९८० साली केंद्र सरकारकडे सादर केला. या अहवालामध्ये जुलाह, नदाफ, पिंजारी आणि भिश्ती या मुस्लिम जातींचाही समावेश होता. मुस्लिम धर्मात जाती नाहीत असा अनेकांचा पूर्वापार समज होता. मग या जाती आल्या कुठून? मंडल आयोगाच्या अहवालातील नोंदीने अन्सारींना अक्षरशः झपाटून टाकले. त्यांनी ओबीसी चळवळीत आधीच सक्रीय असलेलेल जनार्दन पाटील, समाजवादी विचारांचे पत्रकार कपिल पाटील, आंबेडकरी विचारवंत  प्रा. अरुण कांबळे सारख्या अनेकांसोबत संपर्क साधला आणि इतर मागास वर्गाचा मुद्दा मुळातून समजून घेतला. लोकव्यवहारात मुस्लिमांमध्ये जाती आहेत असा जिवंत अनुभव स्वतः अन्सारी यांचा होता. त्यामुळे मुस्लिमांमधील या भेदभावग्रस्त जातींपर्यंत इतर मागास वर्गांसाठी लागू करण्यात आलेल्या तरतुदी पोहोचाव्यात याचा ध्यास अन्सारींनी घेतला. यातूनच १९८१ साली त्यांनी महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन केली. समाजवादी नेतेमंडळी आणि विचारवंत वगळता या संघटनेविषयी मुस्लिम जनतेत फारसा उत्साह नव्हता. १९९० साली मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर काहीसा जनाधार उभारण्यात त्यांना यश आले. एका धडपड्या कार्यकर्त्यांचा हा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला होता, ते आव्हान होते मुस्लिम समाजातील पुराणमतवाद्यांचे, परंतु मुस्लिम तरुण तरुणींच्या भौतिक प्रश्नाला केंद्रस्थानी ठेवत अन्सारींनी पुढेही ही धडपड सुरु ठेवली, या प्रक्रियेत त्यांनी व्यापक ओबीसी चळवळ आणि फुले-आंबेडकरी चळवळीशी स्वतः ला जैविकरीत्या जोडून घेतले.

ओबीसी चळवळीत प्रवेश

मंडल आयोगाचा अहवाल १९८० साली सादर करण्यात आला असला तरी त्याची तातडीने अंमलबजावणी होत नव्हती. तेव्हा राष्ट्रीय पिछडा वर्ग महासंघाची स्थापना झाली. चौधरी ब्रह्मप्रकाश, कर्पुरी ठाकूर, कांशीराम यांच्यासारख्या नेत्यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अधिवेशन भरवले, त्यात महाराष्ट्रातील प्रतिनिधींमध्ये अन्सारींचाही समावेश होता. महाराष्ट्रातील मंडल आयोग कृती समितीने पुण्यात १९८३ साली एक राज्यव्यापी परिषद भरवली त्यात अन्सारी निमंत्रित होते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेनेही जालना येथे १९८४ साली मंडल आयोग अंमलबजावणीसाठी परिषद भरवली. या परिषदेने मुस्लिम ओबीसींचा प्रश्न राष्ट्रीय पटलावर नेला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी चौधरी ब्रह्मप्रकाश होते. मुस्लिम ओबीसींच्या प्रश्नांसह मराठवाडा विद्यापीठ नामांतराची मागणी या परिषदेत करण्यात आली. प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. अरुण कांबळे यांच्यासारखे नामांतरवादी नेते या परिषदेत सहभागी झाले होते. पुढे संघटनेचा विस्तार झाला आणि ‘ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन’ म्हणून नावारूपाला आली. भटक्या आणि मागासवर्गीय मुस्लिम जातींना ओबीसी प्रमाणपत्र मिळावे हा एककलमी कार्यक्रम ठरवून अन्सारींनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. छप्परबंद, शिकलगार, सायकलगार, मदारी, अस्वलवाले, सापवाले, फकीर, भांड, डोंबारी, गारुडी, धावड, पाथरवट, माकडवाले, टकारी, कल्हईगार, इराणी, चित्ता पारधी, भिश्ती, काकर अशा कितीतरी जातींचा शोध घेऊन त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे काम त्यांच्या संघटनेने केले. त्यांच्या संघटनेने किती अभिनव पद्धतीने या जातींची ओळख पटवली याची प्रचिती एका उदाहरणातून येते. मुस्लिम पाथरवट आणि धावड यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्यात अडचण झाली तेव्हा संघटनेने संशोधन केले, मुंबईतील मदनपुरा येथील एका मशिदीचे नाव दगडफोडु मशीद असल्याचा पुरावा देऊन मुसलमानात दगड फोडणारी जात आहे हे सिद्ध झाले. संघटनेच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने पुढे वेळेवेळी परिपत्रक काढून अशा अनेक भटक्या जाती जमातींना जात प्रमाणपत्र मिळवणे सुकर केले.

अन्सारी मुस्लिमांना जातीच्या नावाने फितवत आहेत अशी कुजबुज पुराणमतवादी मुस्लिम गटांतून केली जात होती. जमात-ए-इस्लामी हिंदचे मुखपत्र ‘दावत’ मधून विशेष अशी टीका अन्सारींच्या संघटनेवर झाली. त्याचा वेळोवेळी जाहीर प्रतिवाद अन्सारी यांनी केला. पुराणमतवाद्यांसोबत एका मशिदीत झालेल्या जाहीर वादिवादाची वृत्तांत त्यांनी आपल्या ‘मंडलनामा’ या राजकीय आत्मवृत्तात दिलेला आहे. संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्या नसीम महात यांनी महिला बचत गट, गृहउद्योग अशा विविध उपक्रमातून मुस्लिम महिलांचे उन्नयन साधले. याशिवाय नर्सिंग महाविद्यालय सुरु केले.

अन्सारी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे महानायक दिलीप कुमार यांच्यासारखं प्रसिद्ध व्यक्तिमत्व मुस्लिमांच्या राजकीय उत्थानासाठीच्या चळवळीत सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं. दिलीप कुमार यांनी सामाजिक न्यायाच्या व्यापक राजकारणासाठी अन्सारी यांच्यासोबत भारतभर दौरे केले, ठिकठिकाणी मेळावे भरवले. धार्मिक सलोखा, सामाजिक न्यायाचा सहभाव आणि प्रबोधन अशा त्रिसूत्रीवर दिलीप कुमार, जॉनी वॉकर, हसन कमाल यांच्यासारखे सिनेसृष्टीतील लोकं चळवळीशी जोडले गेले.

संघटनेने केलेल्या सामाजिक मशागतीला राजकीय फळही मिळाले. १९९९ साली संघटनेचे सभासद असलेले दोन आमदार निवडून आले. परंतु निवडणुकीच्या राजकारणाच्या काही अंगभूत मर्यादा आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी संस्थात्मक काम आणि सामाजिक प्रबोधन सुरु ठेवले. जातनिहाय जनगणना व्हावी अशी त्यांच्या संघटनेची ठाम भूमिका होती. परंतु जातनिहाय जनगणना झाल्यावर पुढे राजकीय कृतिकार्यक्रम काय असावा याची स्पष्टता एकंदरच ओबीसी राजकारणासारखी त्यांच्या संघटनेकडेही नव्हती. मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही असलेल्या संघटनेला त्यापुढील कार्यक्रमपत्रिकेच्या स्पष्टतेअभावी काही मर्यादा आल्या.

सारेच दीप कसे मंदावले आता...

२००६ साली सच्चर कमिटीने दिलेल्या अहवालात मुस्लिमांच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे विवरण दिलेले आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या तुलनेत मुस्लिमांची स्थिती अधिक भीषण असल्याचा निर्वाळा सच्चर कमिटीने दिला आहे. सामाजिक न्यायाचे राजकारण आणि जगण्या-मरण्याचे भौतिक प्रश्न यांना घेऊन इथल्या बहुसंख्य श्रमिक आणि कष्टकरी जाती-वर्गांशी मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न अन्सारी सतत करत राहिले. महाराष्ट्रात आज ओबीसी राजकारण कुंठीत अवस्थेत सापडले आहे. ओबीसी राजकारण प्रतिनिधित्वाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टीच गमावून बसले आहे अशी स्थिती सध्या आहे. अलीकडे शेतकरी जाती आणि ओबीसी यांच्यातील धनदांडग्यांच्या राजकीय रस्साकशीत शेतकरी जाती आणि ओबीसी यांच्यातील बहुसंख्य वंचित घटक भरडला जातोय. अशात ओबीसींसाठी आर्थिक संसाधनांची मागणी करणारे, छोट्या मोठ्या पातळीवर राजकीय लढे उभारणारे आणि सांस्कृतिक सहभावासाठी प्रबोधन करणाऱ्या अन्सारी यांच्यासाखे मंडलयात्रीचे निर्वाण मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.

No comments:

Post a Comment

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...