Saturday, June 14, 2025

मुद्दा आहे वर्णभेद विरोधी असण्याचा ...

 

क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने ‘निलिंग’ म्हणजे वर्णभेदाच्या विरोधात एक गुढगा टेकवण्याची निषेधकृती करण्यास नकार दिल्यानंतर वर्णभेद आणि क्रीडाक्षेत्र यांच्या सहसंबंधावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. भूमिका घेणे  हा ज्या त्या व्यक्तीचा खाजगी निर्णय असतो आणि त्याला तुम्ही बाध्य करू शकत नाही असा सर्वसामान्य चर्चेचा सूर होता. डी कॉक ने वेस्ट इंडीज विरुद्धच्या पुढील सामन्यात ‘व्यक्तिगत कारणामुळे’ न खेळण्याचा निर्णय घेतला. कर्णधार तेम्बा बवूमा ने या वादावर संयत भूमिका घेत डी कॉक च्या व्यक्तिगत मताचा आम्ही आदर करतो


असे म्हटले. पुढील सामना श्रीलंका सोबत होणार होता त्या आधी डी कॉक ने सदर विवादावर जाहीर दिलगिरी व्यक्त करत लांबलचक स्पष्टीकरण दिले. ‘मी वर्णभेद करणारा (रेसीस्ट) नाही’ असे डी कॉक त्यात म्हणाला. इतिहासात आणि वर्तमानातही वंशवाद-वर्णभेदाने ग्रस्त देशात मी रेसीस्ट नाही एवढे म्हणणे पुरेसे आहे का? किंवा डी कॉक चा भूमिका न घेणे हा निर्णय खाजगी राहतो का? तर दक्षिण आफ्रिकेचा इतिहास बघता मुद्दा फक्त वर्णभेदी नसण्याचा नसून वर्णभेद विरोधी असण्याचा आहे असेच म्हणावे लागते. दक्षिण आफ्रिकेत ‘निलिंग’ चे अनन्यसाधारण महत्व का आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावे लागेल.

क्रिकेट, साम्राज्यवाद आणि वंशवाद: 

युरोपियन साम्राज्यावादाने जगभरात आपले वर्चस्व केवळ बळाच्या जोरावरचं स्थापित केलं नाही तर युरोपियन संस्कृती इतरांवर थोपविण्याचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा होता. डार्विन च्या सिद्धांताचा तोडून-मरोडून ‘बळी तो कान पिळी’ असा अर्थ युरोपीयन साम्राज्यावाद्यांनी लावला आणि माणसांचे ‘वंश’ (Race) असल्याची निराधार कल्पना उभी केली. ‘गौरवर्णीय वंश’ हा जात्याच ‘श्रेष्ठ’ आहे आणि जगातील ‘निकृष्ट वंशांवर’ तो सत्ता गाजविण्यासाठी ‘पात्र’ आहे असे तर्क मांडून साम्राज्यवाद्यांनी त्यांच्या राज्याला ‘वैधता’ प्राप्त करून दिली. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सुरवातीला ‘डच सिव्हिलायझेशन मिशन’ ने सतराव्या-अठराव्या शतकात प्रवेश केला, त्यांच्या मते आफ्रिकेतील काळे माणसं ही प्राणीसदृश्य (creatures) आहेत आणि आम्ही त्यांना ‘सुसंकृत’ करण्यासाठी आलो आहोत असाही त्यांचा दावा होता, आफ्रिकेतील लोकांना गुलाम बनववून त्यांची खरेदी विक्री सुद्धा यानंतरच्या काळात सुरु झाली  (डच भाषिक लोकांचा हा समूह आफ्रीकान्स म्हणून ओळखला जायचा). एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला ब्रिटीशांनीही दक्षिण आफ्रिकेत आपला हस्तक्षेप वाढवत वसाहती स्थापन केल्या. क्रिकेट हा खेळ आफ्रिकेत वसाहतीकरणाच्या प्रक्रियेसोबतच गेला. क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी सचोटी ही फक्त ‘श्रेष्ठ’ वंशाकडे असते असे ‘वांशिक मूल्य’ क्रिकेट ला चिकटलेले होते. क्रिकेट हे गोऱ्यांचे ‘अस्सलपणाचे लक्षण’ मानले जायचे. म्हणूनच वसाहतींचे ‘शिस्तीकरण’ करण्यासाठी क्रिकेट हे एका प्रकारचे सांस्कृतिक मध्यम म्हणून वापरले गेले. युरोपीय लोकांचा आफ्रिकेतील काळ्यांसोबत ‘अंतर’ ठेवण्यासाठी आणि काळ्या महिलांशी संपर्क टाळण्यासाठी क्रिकेट ला महत्व होते. आफ्रिकेतील वसाहतकारांमध्ये डच आणि ब्रिटीश अशा दोन गौरवर्णीय भाषिक समूहांची ‘साउथ आफ्रिकन’ म्हणून जी सामुहिक ओळख निर्माण झाली त्यात क्रिकेट ने महत्वाची भूमिका पार पाडली होती. गोऱ्या वसाहतवाद्यांनी आपला ‘अस्सलपणा’ आणि ‘वांशिक श्रेष्ठत्व’ जोपासण्यासाठी क्रिकेट च्या नियमन आणि प्रशासनामध्ये हिरीरीने सहभाग घेतला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटचं संस्थात्मक स्वरूपचं मुळात वंशवादी होतं.

अपरथाइड आणि क्रिकेट :

बोअर च्या युद्धानंतर १९०५ मध्ये ‘साउथ आफ्रिकन नेटिव्ह अफेयर्स कमिशन’ (SANAC) ची स्थापना करण्यात आली. कमिशन चे चेअरमन गोडफ्रे लॅक्डेन यांनी आफ्रिकेतील लोकं बुद्धीने कमी असतात आणि याबाबतीत ते बबून माकडांसारखे असल्याचे म्हटले. यानंतर काळे आणि गोऱ्यांच्या वेगळ्या वस्त्या झाल्या ज्याला आपण ‘विलगीकरण’ म्हणतो. ‘वंशनिहाय’ वस्त्या, दवाखाने, खेळाची मैदाने, नागरिकता इ. सर्व गोष्टी ‘वंशाच्या’ आधारावरच वाटल्या गेल्या.  यात अर्थातच काळ्यांना शेवटचे स्थान होते. गोरे, कलर्ड, एशियन, काळे अशी उतरंड वंशाच्या कृत्रिम कल्पनेच्या आधारावर उभी केली गेली. पुढे ‘वंशाला’ अधिकृत कायदा मानून ‘अपर्थाईड राजवट’ (वंशवादी-वर्णभेदी राजवट) (१९४८-९४) लागू झाली. खेळ खेळण्याच्या सर्वच सोयी सुविधा गोऱ्यांच्या वस्तींमध्ये असल्याने इतर वर्णीयांना क्रिकेट मध्ये समना संधी नाकारली गेली. अशा सर्व प्रकारच्या अभावग्रस्ततेही काळ्यांच्या वस्तीत क्रिकेट खेळले जायचे. नारळाच्या काथ्या पासून बनवलेल्या जुनाट चटइंवर खेळूनही याकुब ओमर आणि बॅसील डी’ऑलीवेरा सारख्या काळ्या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी केली होती. डी’ऑलीवेरा (१९६६-७२) हा ‘कलर्ड’ खेळाडू वांशिक कायद्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करू शकत नव्हता परिणामी त्याने इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय सामने खेळले. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात १९६८ साली होणाऱ्या मालिकेत डी’ऑलीवेरा इंग्लंड कडून खेळणार असे स्पष्ट झाल्यावर दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन प्रधानमंत्री बी. जे. वोर्स्टर यांनी डी’ ऑलीवेरा च्या खेळण्याच्या शक्यतेला स्पष्ट नकार देत दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या अशा वंशवादी धोरणामुळे जागतिक क्रिकेटने त्यांच्यावर बंदी घातली.(१९७०-९१) दरम्यानच्या काळात अपरथाइड शासनाने काळ्यांच्या मुक्तीसाठी चालणाऱ्या चळवळींना बेकायदेशीर ठरविले होते, राजकीय संघर्षाची ही पोकळी black sports ने भरून काढली. क्रिकेटच्या मैदानावर अधिकार सांगणे ही काळ्यांच्या प्रतीरोधाची कृती ठरत होती. वंशवादी राजवटीने प्रतिरोध करणाऱ्या अशा खेळाडूंची संभावना ‘स्पोर्ट्स टेररिस्ट’ म्हणून केली. काळ्यांच्या चळवळी उत्तरोत्तर बळकट होत गेल्या आणि शेवटी अपरथाईड राजवटीचा पाडाव होऊन लोकशाही आणि मानवी हक्कांच्या नव्या साउथ आफ्रिकेचा जन्म झाला. ‘नो नॉर्मल स्पोर्ट्स इन अॅबनॉर्मल सोसायटी’ अशी घोषणा करण्यात आली. वंशवादी धोरणाचा त्याग करून क्रिकेट आता सर्वसमावेशक होणार याच अटीवर दक्षिण आफ्रिका संघाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन शक्य झालं.

ट्रान्सफॉर्मेशन आणि क्रिकेट: आपण आधी बघितलं तसं क्रिकेट ला जो वंशवादाचा पूर्वइतिहास राहिला तो लक्षात घेता वर्ण भेदाशी नवं साउथ आफ्रिका जो लढा देत होता त्यात क्रिकेटला अर्थातच महत्वाचे स्थान होते.मानवी हक्क आणि लोकशाहीवर आधारित समाजाची स्थापना करण्याच्या या प्रक्रियेला ‘ट्रान्सफॉर्मेशन’ म्हटले गेले. परंतु वांशिक पूर्वग्रह/भेदाभेद आणि संसाधनांच्या अभावामुळे क्रिकेटमध्ये काळ्यांचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व अजूनही दिसत नव्हते. म्हणूनच काळ्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. वर्णभेदामुळे ज्यांना वगळले जाते अशा समूहांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले या अंतर्गत दोन काळे खेळाडू संघात असावे असे अनिवार्य करण्यात आले. मखाया न्टीनी आणि पॉल अॅडम्स हे पहिल्या पिढीतील काळे खेळाडू होते. हे दोघे ‘कोटा’ (आरक्षित) खेळाडू आहेत आणि मेरीटधारी असूनही आम्हाला वगळले गेले अशी तक्रार पॅट सिमकॉक्स आणि निकी बोये या गौरवर्णीय खेळाडूंनी केली होती. पुढे न्टीनी ने त्याच्या कारकिर्दीत ६०० च्या वर बळी घेतले आणि अॅडम्स चे गोलंदाजी चे आकडे सुद्धा बोये आणि सिमकॉक्स यांच्यापेक्षा सरस होते. आरक्षणाची तरतूद नसती तर न्टीनी आणि अॅडम्स यांना संधी मिळाली नसती अशीच तेव्हा परिस्थिती होती. पुढे हाशीम आमला, वर्नेन फीलँडर, कगीसो रबाडा सारख्या महान खेळाडूंना आरक्षणाच्या तरतूदी मुळेच  संधी मिळू शकली.

निलिंग कशासाठी?  : जॉर्ज फ्लॉईड च्या हत्येनंतर जगभरात जी Black Lives Matter चळवळ सुरु झाली तिला समर्थन आणि वर्णभेदाला विरोध दर्शविण्यासाठी लुंगी इंगिडी या काळ्या खेळाडूने भूमिका घेण्याचे मत मांडले. मानवी हक्कांसाठीच्या या प्रतीकात्मक कृतीला कोणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते पण दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूंनी इंगिडी ला या भूमिकेसाठी लक्ष केले. या निमित्ताने आपल्या वंशवादी पुर्वाग्रहांचे जाहीर प्रदर्शन पॅट सिमकॉक्स, बोएटा डीपेनार, रुडी स्टेन हे माजी खेळाडू करत होते. याला प्रतिक्रिया म्हणून हाशीम आमला आणि अॅश्वेल प्रिन्स यांनी इंगिडी ची पाठराखण करत वर्णभेदाचे त्यांचे अनुभव आणि मत जाहीर केले. मखाया न्टीनी ने खेळत असतांना त्याच्या वाट्याला आलेला एकाकीपणा आणि भेदाभेदाचे अनुभवकथन केले. जीयोफ्री टोयना यांना वर्णभेदामुळेच दक्षिण आफ्रिका संघाचं प्रशिक्षक होता आले नाही. अहमद ओमर या माजी खेळाडूने गोऱ्या खेळाडूंना काळ्यांच्या तुलनेत तिप्पट पगार होता असे म्हटले, खाया झोन्डो, लोन्वाबो सोत्सोबे आणि थामी त्सोलेकिले यांच्यासोबत तत्कालीन गौरवर्णीय कर्णधारांनी कसा भेदभाव केला हे त्यांनी उघडपणे बोलून दाखविले. कोटा प्लेयर्स ला आधी बोलायची सोय नव्हती, ‘निलिंग’ च्या चर्चेमुळ दक्षिण आफ्रिका क्रिकेट मधील वर्णभेदाच्या कितीतरी गोष्टी उघड होऊ शकल्या. पॉल अॅडम्स ची वांशिक मानखंडना करण्यासाठी ‘ब्राऊन शीट इन द रिंग, ट्रा ला ला ला’ असे गाणे ड्रेसिंग रूम मध्ये गायिले जायचे हे  मार्क बाउचर या माजी गौरवर्णीय खेळाडूने अलीकडेच मान्य केले आहे. या समकालीन घटना दक्षिण आफ्रिका क्रिकेट मधील वर्णभेदावर भाष्य करतात. वर्णभेदावर जाहीर लोकचर्चा ‘निलिंग’ च्या निमित्ताने होते आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मधील वर्णभेदाचा गतकालीन इतिहास आणि समकालीन वास्तव बघता भूमिका न घेणे हा क्विंटन डी कॉक चा ‘खाजगी’ निर्णय असू शकत नाही. कारण डी कॉक नव्या दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करतो ज्याला ‘रेनबो नेशन’ (सर्वसमावेशक) म्हटले जाते. ज्या संघाच्या खेळाडूंना आता स्प्रिंगबॉक्स (अपरथाईड राजवटीचे चिन्ह असलेले हरीण) च्या एवजी प्रोटीया (नवीन दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय फुल ज्यातून सर्वसमावेशकतेचा बोध होतो). दक्षिण आफ्रिका संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमनच वंशभेदविरोधी कटीबद्धतेमुळेच होऊ शकले हे इथे विसरता कामा नये. म्हणून मुद्दा आहे वर्णभेद विरोधी असण्याचा...     

 

© सागर नाईक

+91-9511265803

 

 

 

1 comment:

सोनाचंद बन गया 'कॉमन मॅन'

तुम्ही राज कपूरचा श्री ४२० पाहिलाय का? नसेल पाहिला तर त्याची पटकथा थोडक्यात देतो, असेल तर हा भाग स्किप करू शकता.  राज (राज कपूर) हा अलाहाबाद...